राजकीय विषय सोडून विविध क्षेत्रांतील मान्यवर, विचारवंत, वक्ते, नागरिकांना मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करता यावेत या उद्देशाने लंडनमधील ‘वेस्ट मिनिस्टिर’ पार्कमधील ‘हाइडपार्क’च्या धर्तीवर डोंबिवलीत ‘रोटरी मुक्त विचार व्यासपीठ’ सुरू करण्याचा निर्णय रोटरी क्लब डोंबिवली पूर्व विभागाने घेतला आहे. देशात सुरू होणारे हे अशा प्रकारचे पहिलेच व्यासपीठ असल्याचा दावा संस्थापकांनी केला आहे.
अशा प्रकारचे व्यासपीठ भारतात कोठेही सुरू नसल्याचे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक नागरिक सजग झाला आहे. देशातील, आजूबाजूची परिस्थिती याविषयी त्याच्या मनात अनेक प्रश्न, विचार असतात. हे विचार व्यक्त करण्यासाठी त्याला मुक्त व्यासपीठ नसते.
प्रत्येक संस्था, संघटनेची एक चौकट असते. त्यामुळे तेथे त्याला त्याचे विचार मांडण्यास मुभा मिळतेच असे नाही. समाजातील चांगले वक्ते, विचारवंत, प्रभावी मत मांडणारे नागरिक यांना आपले विचार मुक्तपणे मांडता यावेत यासाठी रोटरी क्लब डोंबिवली पूर्व विभागाने हे मुक्त व्यासपीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या प्रकल्पाचे सल्लागार डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्यां व प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती गाडगीळ, क्लब अध्यक्ष मुकुंद इनामदार, विश्राम परांजपे, दिलीप काटेकर यांच्या सहमतीने मुक्त व्यासपीठाची नियमावली तयार करण्यात आली आहे. रोटरी ही पूर्णपणे सामाजिक कार्यासाठी वाहिलेली संघटना असल्याने या मुक्त व्यासपीठाचा वापर राजकीय विषय वगळून सामाजिक, नागरी, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विषय मांडण्यासाठी मोकळे असेल. वक्ता बाहेरचा असला तरी व्यासपीठावर पूर्ण नियंत्रण रोटरी क्लबचे असेल. मुक्त विचार करण्यापूर्वी वक्त्याच्या भाषणाची एक लिखित प्रत रोटरीच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. भविष्यात त्याचा एक संदर्भग्रंथासारखे पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले.
मुक्त व्यासपीठासाठी प्रेक्षकवर्ग हा प्रत्येक वक्त्याचा असणार आहे. रोटरीच्या १२ नियमांच्या चौकटीत बोलणारा वक्ता असेल तरच त्यास परवानगी देण्यात येईल. बुधवार, शनिवार, रविवारी मुक्त व्यासपीठ खुले राहणार आहे.
लंडनमधील संकल्पना
लंडनमध्ये १६० वर्षांपूर्वी वेस्ट मिनिस्टर या ३५० एकरच्या मैदानातील हाइडपार्कमध्ये विविध भागांतील नागरिक एकत्र येऊन मुक्तपणे बोलत असत. त्याला नंतर सरकारी पातळीवरून आकार देण्यात आला. या व्यासपीठाचे महत्त्व वाढल्यानंतर या व्यासपीठावर कार्ल मार्क्स, ब्लादिमीर लेनिन, जॉर्ज आर्वेल आदी विचारवंतांनी वेळोवेळी हजेरी लावून विचार व्यक्त केले. मुक्त विचार ऐकण्यासाठी नागरिक नियमितपणे आजही हाइडपार्कमध्ये येतात. बाहेरून सरकारी नियंत्रण असलेले पण आतमध्ये मुक्त विचार मांडण्याची संधी असलेले हे ठिकाण लंडनमध्ये आहे. अशी व्यासपीठे सिंगापूर, मलेशिया, कॅनडा, अमेरिका, नेदरलँड आदी देशांत आहेत. भारतात अशा प्रकारचे मुक्त व्यासपीठ नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशात जे पहिले सुरू होते ते डोंबिवलीत म्हणून रोटरी क्लबने हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले.
रोटरी भवनमध्ये व्यासपीठ
डोंबिवली एमआयडीसीतील रोटरी भवनमध्ये अॅम्फीथिएटरमध्ये २५० नागरिक बसण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी हे मुक्त व्यासपीठ सुरू करण्यात येत आहे. १२ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विचारस्वातंत्र्य विषयावर कुबेर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2014 रोजी प्रकाशित
डोंबिवलीत रोटरीचे देशातील पहिले ‘मुक्त विचार व्यासपीठ’
राजकीय विषय सोडून विविध क्षेत्रांतील मान्यवर, विचारवंत, वक्ते, नागरिकांना मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करता यावेत या उद्देशाने लंडनमधील ‘वेस्ट मिनिस्टिर’ पार्कमधील ‘हाइडपार्क’च्या धर्तीवर डोंबिवलीत ‘रोटरी मुक्त विचार व्यासपीठ’ सुरू करण्याचा निर्णय रोटरी क्लब डोंबिवली पूर्व विभागाने घेतला आहे.
First published on: 28-02-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Countries first free thought forum of rotary in dombivli