कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी येथील आशा बन्सीलाल जाधव या तरूणीचा तिचाच मामेभाऊ दीपक मंगलसिंग डांगे याने निर्घृण खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला बारा दिवसांची पोलीस कोठडी दिली.
डोंबाळवाडी येथील आशा व दिपक या आते-मामे भावंडांचे मागील सहा महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. काल सायंकाळी आशा हिने दिपक यास आपण पळून जाऊन लग्न करण्याचाआग्रह धरला होता. मात्र, दीपकला ते मंजूर नव्हते. त्यामुळे हे प्रकरण घरी सांगण्याची धमकी आशाने त्याला दिली. त्याचाच राग मनात धरून दीपकने आशाला मारहाण केली. त्यात डोक्यात मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. नंतर दीपकने तिला तेथेच एका खड्डय़ातील पाण्यात टाकले व पळून गेला.
बेपत्ता आशाचा कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळला. तसे पोलिसांना कळवण्यात आले. त्यांना दीपकवर संशय आल्याने तपासणी केली असता कपडय़ावर रक्ताचे डाग आडळले. पोलिसांनी ताब्यात घेताच दीपकने गुन्ह्य़ाची कबुली दिली. आज दीपकला कर्जत येथे प्रथम न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर हजर केले असता त्याला दि. १७ पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली.