मुंबईतील चौपाटय़ांच्या विकासाचे ढोल वाजविणाऱ्या पर्यटन विभागाला प्रत्यक्षात चौपाटय़ांवर मूलभूत सुविधा पुरविण्यातही अपयश आले आहे. त्याचे एक उदाहरण मालाडमधील आक्सा चौपाटीच्या निमित्ताने पाहायला मिळते.
पश्चिम उपनगरातीलच नव्हे तर मुंबई शहर, ठाणे, कल्याण आदी भागांतील पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून आक्सा चौपाटीचे नाव घेतले जाऊ लागले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी भलतीच वाढली आहे. परंतु, स्वच्छतागृह किंवा शौचालयासारख्या मूलभूत सुविधांची या चौपाटीवर वानवा असल्याने पर्यटकांना मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.
मालाड स्थानकापासून साधारणपणे नऊ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आणि काहीशा निर्मनुष्य व शांत असलेल्या या चौपाटीकडे आतापर्यंत पर्यटक फारसे वळत नव्हते. या चौपाटीचा किनारा चढउतारांचा असल्याने पोहण्यासाठी ही चौपाटी काहीशी धोकादायक आहे. एका ठरावीक मर्यादेच्या पुढे जाऊन पोहण्यास बंदी आहे. परंतु, ही एक गोष्ट वगळली तर विस्तृत किनारा, शांतता आणि स्वच्छता यामुळे या चौपाटीवर निवांतपणे फिरण्यासाठी म्हणून पर्यटक मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत.
शनिवार-रविवारी ही चौपाटी पर्यटकांनी फुलून गेलेली दिसते. आता उन्हाळी सुट्टीत तर रोजच पर्यटकांनी चौपाटी फुलून गेलेली असते. चादरी, चटया घेऊन या चौपाटीवर काही क्षण निवांत घालविणाऱ्यांमध्ये आबालवृद्धही मागे नाहीत. पाणीपुरी, भेळ, बर्फाचा गोळा, कणीस, वडापाव, आईस्क्रीम, गरमागरम भजीपासून ते ऑम्लेट पाव, सॅण्डवीच अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची चव चाखत या चौपाटीवर पर्यटक मनसोक्त फिरत असतात. पर्यटकांसाठी म्हणून आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची मात्र या चौपाटीवर वानवा आहे.
एक म्हणजे इतक्या मोठय़ा चौपाटीवर साधे स्वच्छतागृह नाही. पुरुष आपले नैसर्गिक विधी आडोशाला उभे राहून करू शकतात. परंतु, महिला आणि त्यातही वृद्धांचे काय, असा प्रश्न पडतो. दुसरे म्हणजे या चौपाटीकडे येणारा रस्ता चिंचोळा आहे. या रस्त्यावरच कडेला वाहने उभी केली जातात. त्यामुळे, शनिवारी-रविवारी या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर होतो. गणपती विसर्जनाच्या दिवशी तर या ठिकाणी भयंकर परिस्थिती असते, असे स्थानिक सांगतात.
मुंबईतील चौपाटय़ांचा विकास करण्यासाठी प्रत्येक चौपाटीवर स्वच्छतागृह उभारण्याची घोषणा राज्याच्या पर्यटन विभागाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात केली होती. पण, या विभागालाही आपल्या घोषणांचा विसर पडला आहे, असेच चित्र आक्सा चौपाटीवरील एकूण परिस्थिती पाहिल्यावर दिसून येते.
केवळ आक्साच नव्हे तर या किनाऱ्याला लागून असलेल्या मार्वे, मढ, सिल्व्हर लॅण्ड या चौपाटय़ांवरही पर्यटकांची गर्दी वाढते आहे. यापैकी आक्साच्या किनाऱ्यावर सर्वाधिक गर्दी असते. यामुळे, इथे एक स्वच्छतालय असावे अशी मागणी २०१२लाच मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. परंतु, समुद्रकिनारी बांधकाम करण्यासाठी असलेल्या सीआरझेड नियमावलीचा फटका बसल्याने हा प्रस्ताव अजून बासनात आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी साधी पोलिसांची चौकीही येथे बांधता आली नाही, म्हणून आम्ही पोर्टेबल चौकी उभारली. पण, त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी अभावानेच दिसतात. आता तर ही लाकडी चौकीही कुजून गेली आहे, असा तक्रारीचा पाढा स्थानिक (पी-उत्तर) नगरसेवक अजित भंडारी यांनी वाचला.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2015 रोजी प्रकाशित
आक्सा चौपाटीवर स्वच्छतागृहाच्या उभारणीत सीआरझेडची अडचण
मुंबईतील चौपाटय़ांच्या विकासाचे ढोल वाजविणाऱ्या पर्यटन विभागाला प्रत्यक्षात चौपाटय़ांवर मूलभूत सुविधा पुरविण्यातही अपयश आले आहे. त्याचे एक उदाहरण मालाडमधील आक्सा चौपाटीच्या निमित्ताने पाहायला मिळते.

First published on: 27-05-2015 at 08:15 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crz problem in aksa beach