दारू व गुटख्यासाठी पैसे न दिल्याने महिलेसह तिघांनी लोखंडी हत्यारांनी हल्ला करून एकास जबर जखमी केले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली.बुधवारी रात्री मारहाणीचा प्रकार घडला. सचिन अशोक रोकडे (शहानगर, चिकलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद) याने फिर्याद दिली. त्यानुसार सोमीनाथ पटेकर, भोजा पटेकर व लक्ष्मीबाई पटेकर (सर्व शहानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास सचिन हा किराणा दुकानात चालला होता. दुकानासमोर अडवून या तिघांनी त्याच्याकडे दारू व गुटखा घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र, ते देण्यास नकार दिल्याने या तिघांनी त्याला लोखंडी पट्टी व सळईने बेदम मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद आहे.