जगाच्या पाठीवरील सुमारे ३४ देशांच्या नोटांवर इंग्लंडची राणी एलिझाबेथ-२चे छायाचित्र आहे. ३४ देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. ५५ हून अधिक देशांमध्ये दोन धातूंपासून नाणी बनवली जातात तर आठ देशांमध्ये उभ्या आकाराच्या नोटा आढळतात. राणी एलिझाबेथनंतर सर्वाधिक छायाचित्र सायमन बोलीव्हॉर यांचे असून इंडोनेशिया देशातील एका नोटेवर गणपतीचे चित्र आहे. तर वेस्ट इंडिज भूखंडातील गियाना देशातील स्टॅम्पवर श्रीकृष्ण रंगपंचमी करतानाचे चित्र आहे. वडाळा येथील संजय जोशी यांनी देशोदेशीचे हे चलन आणि त्यासंदर्भातील रंजक माहिती संकलित केली असून गुरुवारी ६ नोव्हेंबरला ठाणेकरांना ती पाहता येणार आहे.
वडाळ्यात राहणाऱ्या संजय जोशींच्या धाकटय़ा भावाला नाणी जमा करण्याचा छंद होता. १९८३ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या संजय यांच्या निदर्शनास ही नाणी आली. दुर्मीळ असलेली नाणी पाहिल्यानंतर आपणही अशाच प्रकारचे संकलन सुरू करावे असे त्यांनी ठरविले. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २९ वर्षे कार्यरत असतानाही त्यांचा हा उपक्रम सुरू राहिला. त्यांचा हा उत्साह पाहून या छंदामध्ये त्यांना एअर इंडियात कार्यरत असलेले धाकटे भाऊ संदीप जोशी यांनीही मदत केली. मित्रमंडळी, नातेवाईक, भाजीवाले, प्रदर्शने, एअर इंडियातील कर्मचारी, ट्रॅव्हल व्यावसायिक अशा सर्वाच्या माध्यमातून हा छंद वाढू लागला. त्यातून संजय जोशींकडे सध्या संयुक्त राष्ट्र संघाचे सभासद असणाऱ्या १९२ देशांच्या ९०० हून अधिक नोटा आणि चार हजारांहून अधिक नाणी जमा झाली आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन जोशी यांनी आता आपला संपूर्ण वेळ आपल्या छंदाला दिला आहे आणि त्याचा शास्त्रीय अभ्यासही सुरू केला. जोशी यांनी नाणेशास्त्रामध्ये एम.ए. केले असून आपल्या संग्रहातून जगाचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्यज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

’ प्रदर्शनाची ठळक वैशिष्टय़े
संजय जोशी यांच्या चलनसंग्रहात मॉण्टेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला, त्या मारिया मॉण्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटली देशाची नोट, एव्हरेस्ट शिखर काबीज केलेल्या सर एडमंड हिलरीचे छायाचित्र असलेली न्यूझीलंड देशाची नोट, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळालेली झिंबाब्वे देशाची शंभर ट्रिलियन डॉलरची नोट आहे. या शिवाय भारतामधील पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश राजवटीतील नोटा, १९७८ मध्ये भारतामधून रद्दबातल झालेली एक हजार रुपयांची नोट, १४ दिवस गव्हर्नर असलेल्या अमिताभ घोष यांच्या सहीची दुर्मीळ नोटही त्यांच्या खजिन्यात आहे. मुंबई, ठाणे, सांगली, पुणे, कोकण अशा भागांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत विविध अशी ५३ ठिकाणी चलनांची प्रदर्शने मांडली आहेत. ठाण्यात गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात टीजेएसबी बँक, हायलँड पार्क, ढोकाळी शाखा, ठाणे येथे प्रदर्शन भरणार असून नागरिकांना ते विनामूल्य पाहता येणार आहे.
’ भारताचा ऐतिहासिक वारसा
संजय जोशी यांच्या संग्रहामध्ये भारतीय नाण्यांचाही ऐतिहासिक वारसा दिसून येत असून इ.स.पूर्व शंभर वर्षांपूर्वीची नाणीही त्यांच्या संग्रहात आहेत. सातवाहन ते आजच्या चलनी नोटांपर्यंतचे संकलन त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये अकबर, औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्यांचा समावेश आहे. भारतामध्ये पाच हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटाही चलनात होत्या मात्र त्या बाद करण्यात आल्या. त्यांपैकी काही दुर्मीळ नोटांच्या फोटोप्रतीही त्यांनी संकलित करून ठेवल्या आहेत