डान्स बारमध्ये होणाऱ्या कोटय़वधीच्या दौलतजादाला पायबंद बसावा आणि उद्ध्वस्त होणाऱ्या तरुणाईला सावरता यावे, यासाठी राज्य सरकारने नऊ वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या डान्स बारमधील थिरकणारी पावले थांबली असली, तरी तेथे वेटरच्या नावाखाली उभ्या राहणाऱ्या डान्स बार मुलींवर होणारी दौलतजादा आजही सर्रासपणे सुरू आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील नटराज नावाच्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये मुलींवर उडविण्यात येणारे पैसे जमा करण्यासाठी प्लॅस्टिकचे सूप आणि झाडूंचा वापर करावा लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बंद केलेल्या या दौलतजादाबाबत भाजपचे फडणवीस सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात बोकाळलेल्या डान्स बार संस्कृतीला शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या एका पत्राने खऱ्या अर्थाने नऊ वर्षांपूर्वी वाचा फोडली. डान्स बारची जन्मभूमी असलेल्या रायगड जिल्ह्य़ातील (१९८० मध्ये खालापूरमध्ये पहिल्या डान्स बारची नोंद) पनवेल तालुक्यात डान्स बारचा फार मोठा सुळसुळाट झाला होता. या डान्स बारमध्ये पुण्याहून येणाऱ्या ‘रसिकांची’ संख्या जास्त होती. त्यामुळे हे रसिक पहाटे घरी परतत असताना अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर नवी मुंबई शहर प्रकल्पात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांची तरुणाई मिळालेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड विक्रीतील पैशामुळे या डान्स बारमध्ये पुरती बरबाद होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पाटील यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि ऑगस्ट २००५ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्स बारवर बंदी घातली. त्यावेळी राज्यात एकूण १४०० डान्स बार होते. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील डान्स बारची संख्या ९०० पर्यंत होती. डान्स बार बंद झाल्याने त्याजागी ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यात आले. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या डान्स बारवरील बंदी उठविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मुंबईतील २०० डान्स बार मालकांनी डान्स बार परवाना नूतनीकरणासाठी अर्ज दिले आहेत, पण राज्य सरकारने त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. डान्स बार सुरू होण्याची कुणकुण लागल्यापासून ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या बारमध्ये दौलतजादाला ऊत आला आहे. डान्स बार सुरू होणार म्हणून अनेक मुली दुबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद येथून परतल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी डान्स बारमध्ये नाचणाऱ्या मुली एका रांगेत ग्राहकांच्या समोर उभ्या राहात आहेत. या मुलींची नोंदणी वेटर म्हणून करण्यात आली असून, टेबलांच्या हिशेबाने त्यांची मयखान्यातील उपस्थिती ठरलेली आहे. त्यामुळे अतिरिक्त मुली या एखाद्या बंद खोलीत बसलेल्या असल्याचे आढळून आले. ग्राहकांच्या समोर उभ्या असलेल्या मुलींवर होणारी दौलतजादा लाखो करोडो रुपयांत आहे. यात एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांचा मोठा भरणा आहे. काही बारमध्ये कडीकुलपात व्हीआयपी कक्षात डान्सदेखील केला जात आहे. ही दौलतजादा नवी मुंबई, पनवेलमधील सर्व ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांच्या नजरेदेखत सध्या सुरू आहे. त्यात बारमध्ये बंदी असताना २१ वर्षांखालील मुलांनादेखील बिनधास्त प्रवेश दिला जात असून, कोपरखैरणे येथील नटराजावर पोलिसांबरोबरच येथील राजकीय मंडळींची कृपा असल्याने ‘तेरी भी चूप और मेरी भी..’ अशी स्थिती आहे. हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. या बारमध्ये प्रवेश करताना अनेक चौकशींचा सामना करावा लागत असून, गुंडांचा लवाजामा बारच्या प्रवेशद्वारावर दिसून येतो. नियमित येणाऱ्या ग्राहकाला मात्र या ठिकाणी पायघडय़ा घातल्या जातात. भर वस्तीत असणारे बार अशाप्रकारे सुरू असल्याने एमआयडीसीत दुपारपासून टणटणाट केला जात आहे. या व्यवसायात मराठी माणूस हा शोधून सापडणार नाही. बार मध्ये साफसफाईच्या कामात विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही तरुण आढळून येतात. त्यामुळे हे बार पोसायचे कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डान्स बारवर बंदी घातल्याने तत्कालीन गृहमंत्री पाटील जनतेचे हीरो झाले होते. त्यामुळे गुजरातप्रमाणे राज्यातील डान्स, ऑर्केस्ट्रा बारवर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
नवी मुंबईत छमछमला ‘अच्छे दिन’
डान्स बारमध्ये होणाऱ्या कोटय़वधीच्या दौलतजादाला पायबंद बसावा आणि उद्ध्वस्त होणाऱ्या तरुणाईला सावरता यावे, यासाठी राज्य सरकारने नऊ वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या डान्स बारमधील थिरकणारी पावले थांबली असली, तरी तेथे वेटरच्या नावाखाली उभ्या राहणाऱ्या डान्स बार मुलींवर होणारी दौलतजादा आजही सर्रासपणे सुरू आहे.
First published on: 05-11-2014 at 07:07 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance bar business take grip in navi mumbai again