साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सर्व भाषक समाजात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. बंगाली, गुजराती आणि मल्याळम समाजात दसरा कसा साजरा केला जातो, ते सांगताहेत अनुक्रमे प्रसून रक्षित, सरिता परिख, राजीव उन्नी.
आलता आणि सिंदुराला महत्व
प्रसून रक्षित
बंगाली समाजाचा दसरा रविवारी नव्हे तर सोमवार १४ ऑक्टोबर रोजी आहे. कारण दशमी ही तिथी सोमवारी येत आहे. बंगाली समाजात नवरात्रौत्सवात घरोघरी दुर्गामातेची पूजा केली जाते. पश्चिम बंगाल/कोलकाता येथे ज्या प्रमाणे दुर्गापूजा उत्सव साजरा केला जातो, तशाच पद्धतीने बंगाली लोक मुंबईत साजरा करतात. दादर, शिवाजी पार्क येथील बेंगॉल क्लब येथे हा उत्सव मोठय़ा प्रमाणात आम्ही साजरा करतो.
बंगाली समाजामध्ये आलता आणि सिंदूर याला खूप महत्त्व आहे. कुमारिका आणि सौभ्याग्यवती स्त्रिया आपल्या पावलांना ‘आलता’ लावतात. तसेच सौभाग्यवती महिला घरून सिंदूर घेऊन जातात व तो दुर्गादेवीच्या मूर्तीला स्पर्श करून घरी आणतात आणि तोच सिंदूर स्वत:च्या कपाळाला लावून आणि भांगात भरून अन्य सौभाग्यवतींना दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी एमकेकांना शुभेच्छापत्रे देणे, मिठाई वाटणे केले जातेच. दरवाजावर तोरण लावतो. गोड म्हणून रसगुल्ले हे जेवणात असतातच. पण त्याचबरोबर पुलाव, तांदुळाची खीर ज्याला आम्ही पायस म्हणतो, ती ही या दिवशी केली जाते. दशमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन केले जाते.
फाफडा आणि जिलबी
सरिता परिख
गुजराती समाजामध्ये नवरात्रौत्सवात बहुतेक घरी ‘गरबा’ (घट) ठेवण्यात येतो. देवाजवळ नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो. दसऱ्याच्या दिवशी या घटाचे विसर्जन केले जाते. घटाचे विसर्जन म्हणजे आम्ही हा घट एखाद्या देवळात नेऊन तिथे ठेवतो. या दिवशी सकाळी आम्ही घरी फाफडा आणि जिलबी हे दोन पदार्थ खाण्यासाठी करतो. शेजारी, मित्र परिवार यांनाही यात सहभागी करून घेतले जाते. जेवणात श्रीखंडी-पुरी असा बेत असतो.
मराठी समाजात या दिवशी शस्त्रपूजाही केली जाते. मात्र आम्ही शस्त्रपूजा करत नाही. गुजरातमध्ये काही गावांमध्ये या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. दुष्ट शक्तींचे निर्दालन या उद्देशाने हे रावण दहन केले जाते. घराला तोरण, नवीन कपडे, देवीची पूजा आणि आनंद व उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
लहान मुलांसाठी विद्यारंभास सुरुवात
राजीव उन्नी
मल्याळम पंचांगानुसार आमचा दसरा अर्थात विजयामदशी हा सण येत्या १४ ऑक्टोबर रोजी आहे. लहान मुलांना शिकविण्यास अर्थात विद्यारंभास आमच्या समाजात या दिवसापासून सुरुवात केली जाते. घरी किंवा देवळामध्ये ती सुरुवात करतो. ‘हरी श्रीगणपतये नम:’ अशी ओळ लहान मुलाचे बोट धरून त्याच्याकडून लिहून घेतली जाते. तो एक छोटा कार्यक्रमच असतो.
मल्याळम समाजात नवरात्रौत्सवात काही घरी ‘कोलू’ बसवितात. कोलू म्हणजे देव-देवी यांच्या लहान-मोठय़ा आकारातील मूर्ती असतात. यात प्रामुख्याने सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी, गणपती यांचा समावेश असतो. घरातील देवासमोर तांब्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते. दर्शनाला येणाऱ्यांना पान, सुपारी दिली जाते. दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे प्रामुख्याने ‘पायसम’ केले जाते. पायसम म्हणजे गूळ, तूप घालून केलेली तांदुळाची खीर. याला आमच्यात खूप महत्व आहे. नारळाच्या वडय़ाही गोड म्हणून केल्या जातात. दरवाजावर तोरण बांधणे, मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे, अष्टमी/ नवमीला पुस्तकांची पूजा करणे आदीही केले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2013 रोजी प्रकाशित
दसरा विविध भाषकांचा!
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सर्व भाषक समाजात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
First published on: 12-10-2013 at 06:48 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara the festival of all cast