बुधवार हा दिवस नाशिक शहरासाठी आंदोलनांचा दिवस ठरला. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांची अतिशय क्रुरपणे थट्टा उडविणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरली तर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त दलीत, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एवढेच नव्हे तर, काँग्रेसच्या नगरसेवकाने उड्डाणपुलाच्या नामकरणाच्या मागणीवरून महापालिकेसमोर टाळ-मृदुंगाच्या गजरात आंदोलन केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरून विधीमंडळात चाललेली लढाई विरोधी भाजप, शिवसेना व मनसे या पक्षांनी रस्त्यावर नेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मनसेने बुधवारी लगेचच मोर्चा काढून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मनसेचे आ. वसंत गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, महापौर अॅड. यतीन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, सुजाता डेरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात उपमुख्यमंत्र्यांच्या बेताल विधानाचा निषेध करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असताना अजित पवार यांनी केलेले विधान त्यांच्या जखमेवर मिठ चोळणारे आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच भाषेत समाचार घेतला होता. आता मनसे या मुद्यावरून अधिकच आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीला असे विधान शोभणारे नाही. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून त्यांची अश्लिल शब्दात थट्टा उडविली जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. यामुळे अजित पवार यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
मनसेचा मोर्चा एकिकडे सुरू असताना दुसरीकडे भटक्या विमुक्त शोषित समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. शासनाकडून राबविण्यात जाणाऱ्या योजनांची कागदपत्रे देण्यास शासकीय अधिकारी टाळाटाळ करतात. रेशनकार्ड त्वरित मिळावेत, अतिरिक्त धान्य कोटा मागील चार वर्षांपासून देण्यात आला नाही. ज्या अधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या सहाय्याने जनतेची फसवणूक केली, योजनांपासून नागरिकांना वंचित ठेवले, अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. भारतनगर, शिवाजीवाडी येथील रहिवाशांचे सर्वेक्षण करून त्यांना घरकुलासाठी प्राधान्य द्यावे, जातीच्या दाखल्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्यात शिथिलता आणावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. तिसरे आंदोलन काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांचे होते. गरवारे पाँइंट ते आडगाव नाकापर्यंत तयार झालेल्या उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव द्यावे, या मागणीसाठी त्यांनी महापालिकेसमोर टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन केले. हे नांव देण्यास कोणाचा आक्षेप असल्यास उड्डाण पुलास रामसेतू हे नाव द्यावे, असेही त्यांनी सूचित केले. तसेच मुंबई नाका चौकात दहा महापुरूषांचे एकत्रित पुतळे बसविण्याची मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
दिवस आंदोलनांचा
बुधवार हा दिवस नाशिक शहरासाठी आंदोलनांचा दिवस ठरला. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांची अतिशय क्रुरपणे थट्टा उडविणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरली तर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त दलीत, आदिवासी, ओबीसी,

First published on: 11-04-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day of agitations