जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित असलेल्या साडेबारा टक्के विकसित भूखंडांच्या इरादा पत्रांचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी करण्यात आले. १६ ऑगस्टला वर्ष पूर्ण होऊन प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्तांच्या हाती भूखंड मिळाले नाहीत. याविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी करळफाटा येथे पंतप्रधानांच्या आश्वासनाचे वर्षश्राद्ध घालून मुंडन करीत पंतप्रधानांचा जाहीर निषेध केला. तसेच जेएनपीटी साडेबारा टक्केचे लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी या वेळी आयोजित शोकसभेत करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते चार ते पाच जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले होते. या वेळी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाच्या वाटपात अनेक अडथळे निर्माण झाले. याविरोधात उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील, काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी तसेच इतर सामाजिक, राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनात सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना मंजूर होऊनही साडेबारा टक्केचे वाटप होत नसल्याने करळफाटा येथे पंतप्रधानांच्या आश्वासनाचे वर्षश्राद्ध घालण्यात आले. तसेच प्रकल्पग्रस्त तरुणांनी आपले मुंडन करून घेतले. तर या वेळी करळ येथे शोकसभा घेऊन शासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला.