यंदा समाधानकारक पावसामुळे राज्यात विविध प्रकल्पांमधील पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पाण्याच्या समन्यायी पाणी वाटपाबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे सांगितले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार एम. एम. शेख, सतीश चव्हाण, संजय शिरसाठ व प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, जि. प. अध्यक्षा विजया चिकटगावकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, हैदराबाद मुक्तिलढय़ात साहसी जनता धर्मभेद विसरून सहभागी झाली. उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात मराठवाडय़ाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आपले हक्क व कर्तव्याबाबत येथील जनता जागरूक आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, नव्या औद्योगिक व वस्त्रोद्योग धोरणामुळे मराठवाडय़ाचे चित्र बदलणार आहे. राज्यातील धरणांच्या पाणीसाठय़ाबाबत मागील वर्षांपेक्षा यंदा समाधानकारक स्थिती आहे. कोरडवाहू शेती शाश्वत करणे, तसेच टंचाई स्थितीच्या कायमस्वरुपी निवारणासाठी पुढील वर्षांत विशेष कार्यक्रम घेऊन विकें द्रित पाणीसाठय़ावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विधी विद्यापीठ स्थापना, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आणखी सक्षम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या वेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार, पोलीस आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची उपस्थिती होती.