अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना २६९ चौरस फुटांची ‘प्रशस्त’ घरे महाग वाटतात? ठीक आहे, मग त्यांना आपण पावणेदोनशे फुटांचे घर कमी किमतीला बांधून देऊ.. हा विचार आहे ‘म्हाडा’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा. जमिनीसाठी पैसे द्यावे लागत नसूनही त्यावर बांधलेल्या घरांचे दर खुल्या बाजारातील घरांएवढेच ठेवणारी म्हाडा आता एका कुटुंबाला लागणारे किमान घरही आणखी १०० चौरस फुटांनी कमी करण्याचा उफराटा विचार करीत आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ‘म्हाडा’ची २६९ चौरस फुटांची घरे भलतीच महाग ठरू लागल्याने ही गरिबांची क्रूर चेष्टा असल्याचा सूर उमटू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर या उत्पन्न गटातील लोकांसाठी सुमारे पावणेदोनशे चौरस फुटांची छोटी घरे बांधल्यास घराच्या किमतीचा प्रश्न निकाली निघेल असा विचार ‘म्हाडा’मध्ये सुरू झाला आहे. घरांचा दर आटोक्यात ठेवण्याऐवजी घराच्या आकाराला कात्री लावण्याचा प्रकार म्हणजे उफराटा कारभार असल्याचा सूर उमटत आहे. गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’च्या घरांचा दर मुंबईत बिल्डरांच्या दरांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घरांची बांधणी करणारी ‘म्हाडा’ ही ओळख पुसली जाऊन तिचे रूपांतर ‘सरकारी बिल्डर’ असे झाले आहे. त्यात भर म्हणून घरांची सोडत निघाल्यानंतर ताबा देताना या घरांच्या किमती अडीच लाखांपासून १५ लाखांपर्यंत वाढवण्याची किमया ‘म्हाडा’ने केली आहे. या पार्श्र्वभूमीवर यंदाच्या ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती या अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी साडेसोळा लाख रुपये अशी ठरवण्यात आली असून या घरांचा आकार २६९ चौरस फूट इतका आहे.

अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना साडेसोळा लाखांचे घर कसे परवडणार, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आणि ‘म्हाडा’बाबतची नाराजीही वाढली. नुकतीच ‘म्हाडा’ने उत्पन्न गटाची फेररचना केली. त्यानंतरही घरांच्या किमतीचा प्रश्न अडचणीचा ठरत असल्याने आता घरांच्या आकाराला कात्री लावून दर कमी करण्याचा विचार ‘म्हाडा’त सुरू झाला आहे. या गटासाठी १६९ चौरस फुटांची घरे बांधल्यास आपोआपच घरांची किंमत मोठय़ा प्रमाणात कमी होईल. शिवाय २६९ चौरस फुटांचीच घरे बांधली पाहिजेत, अशी काही सक्ती नाही. त्यातून तोडगा निघू शकतो, असा विचार ‘म्हाडा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे घरांच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी कसलेही प्रयत्न करण्याचे कष्ट घेण्यास ‘म्हाडा’ तयार नाही. घरांच्या दराचा प्रश्न निघताच आकार कमी करून तो दर कमी झाल्याचा आभास निर्माण होणार आहे.
घरे स्वस्त न होण्याचे कारण बिल्डर
म्हाडाची घरे सरकारी जमिनीवर बांधली जातात. स्वाभाविकच अन्य बिल्डरांप्रमाणे म्हाडाला सर्वसाधारणपणे घरे बांधताना जमिनीचा मोबदला द्यावा लागत नाही. त्यामुळे म्हाडाची घरे तुलनेत अतिशय स्वस्तात उपलब्ध व्हायला हवीत. परंतु एखाद्या परिसरात म्हाडाची इमारत उभी राहिली आणि तिचा दर कमी असेल तर खुल्या बाजारातील घरांचे भावही खाली येतील. अर्थातच बिल्डरांचे नुकसान होईल. म्हणून म्हाडा आपल्या घरांचे भाव कमी करीत नाही, अशी चर्चा सर्रास केली जाते.