भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झालेले नितीन गडकरी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गडकरींचे पुत्र निखील, महापौर अनिल सोले, गिरीश व्यास आणि संदीप जोशी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या घराणेशाहीला सातत्याने टीकेचे लक्ष्य बनविणारे गडकरी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुत्रप्रेमाला फाटा देणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
पदवीधर मतदारसंघावर भाजपचे पारंपरिक वर्चस्व राहिलेले आहे. रा. स्व. संघाचे माजी अ.भा. बौद्धिक प्रमुख मा.गो. वैद्य, रामजीवन चौधरी, गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरींनी विजयाची परंपरा कायम राखली. जून २००८ च्या निवडणुकीत गडकरींनी काँग्रेसचे समर्थन लाभलेले उमेदवार प्रा. बबन तायवाडे यांचा एकतर्फी पराभव करून मतदारसंघावरील पकड सिद्ध केली होती. गडकरींनी एकूण मतदानाच्या तब्बल ५४.६३ टक्के मते घेऊन साऱ्याच उमेदवारांना मोडीत काढले होते. शिक्षक संघटनांचा पाठिंबा नसतानाही गडकरींनी विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
पदवीधर मतदारसंघातील भाजपचे नेटवर्क अतिशय प्रभावी असले तरी उमेदवाराच्या निवडीवरही बरीच समीकरणे अवलंबून राहतील. भाजपमधील महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन, गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखील खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. निखील खडसेदेखील भाजपात सक्रिय झाले होते. गडकरींचे पुत्र निखील सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पाहत आहेत. आमदार होण्याचा पहिला दावा महापौर अनिल सोलेंचा आहे. सोले कट्टर गडकरी समर्थक आहेत. या शर्यतीत संदीप जोशी आणि गिरीश व्यास यांचीही नावे चालविली जात आहेत. परंतु, रिक्त होणारी जागा खुद्द गडकरींची असल्याने त्यांच्याच पसंतीच्या उमेदवाराच्या गळ्यात माळ पडेल, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
संदीप जोशी या तरण्याबांड नेत्याच्या हातात भाजपने पदवीधर मतदारसंघातील नोंदणीची सूत्रे सोपविली आहेत. नव्या मतदारांची नोंदणी आणि जुन्या मतदारांशी संपर्काची मोहीम ते हाताळत आहेत. मागील निवडणुकीसाठी गडकरींनी स्थानिक नेत्यांनाही जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे लक्ष्य दिले होते. वाडय़ावरील आदेश येताच शहराध्यक्ष कृष्णा खोपडे तातडीने कामाला लागले आहे. आता बूथ पातळीवरही भाजपची व्यूहरचना राहणार असल्याने पदवीधर मतदारसंघाची जागा स्वत:कडे कायम ठेवण्यासाठी कार्यकर्ते पूर्ण तयारीला लागले आहेत. नागपूर शहरात ७९ हजार ६२० मतदार तर ग्रामीणमध्ये २० हजार ११२ मतदारांची नोंदणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप गडकरींच्या वारसाच्या शोधात
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झालेले नितीन गडकरी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गडकरींचे पुत्र निखील, महापौर अनिल सोले, गिरीश व्यास आणि संदीप जोशी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या घराणेशाहीला सातत्याने टीकेचे लक्ष्य बनविणारे गडकरी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुत्रप्रेमाला फाटा देणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

First published on: 10-07-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Degree holders constituency bjp searching for a searching