सायझिंग वार्पिंग कामगारांचा दिवाळी हिशोब अदा करूनही ते आठवभर झाला तरी कामावर येत नाहीत. यामुळे इचलकरंजी शहरातील औद्योगिक शांततेला खीळ बसण्याची शक्यता असल्याने कामगार नेत्यांना सूचना देऊन कामगारांना त्वरित कामावर पाठवावे, अशी मागणी बुधवारी इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे केली. ठोंबरे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त बी. डी. गुजर, कामगार नेते प्राचार्य ए.बी.पाटील, शिवगोंडा खोत, भिमराव अतिग्रे यांना बोलावून प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले.
इचलकरंजीतील सायझिंग कामगारांचा दिवाळी बोनसचा प्रश्न तब्बल तीन आठवडे तापला होता. प्रांत ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक बैठक होऊन तोडगा निघाल्यानंतर या प्रश्नावर पडदा पडला होता. त्यानंतर सायझिंग चालकांनी कामगारांचा हिशोब अदा केला. हिशोब देऊन आठवडा झाला तरी हे कामगार नेत्यांच्या सांगण्यावरून अद्यापही कामावर आलेले नाहीत, अशी तक्रार आज सायझिंग असोसिएशनचेअध्यक्ष जयंत मराठे, सुरेश मांगलेकर, प्रकाश गौड, सचिव दिलीप ढोकळे यांच्यासह सायझिंग चालकांनी प्रांत ठोंबरे यांच्याकडे केली.
    सायझिंग कामगारांचे नेते कॉ.सुभाष निकम म्हणाले, बोनसचा प्रश्न उशिरा सुटल्याने दिवाळी साजरी करण्यास न मिळालेले कामगार मालकांना सांगूनच परगावी गेले आहेत. तर काहीजण इतर कामात गुंतलेले आहेत. कामावर न जाण्याची भूमिका कामगारांची वा संघटनेची नाही. तथापि वर्षभर काम करूनही दिवाळीवेळी पुरेसा मोबदला न दिल्याने काही कामगारांनी राजीनामा देऊन अन्य ठिकाणी काम शोधण्यास सुरुवात केली आहे. कामगार कामावर येत नाहीत, असा गैरसमज पसरविला जात आहे.