स्थापनेची शताब्दी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील ‘अशोकपर्व’ नव्या वर्षाच्या साक्षीने संपुष्टात आले. या पार्श्र्वभूमीवर मागील ५ वर्षांत संस्थेत झालेल्या वादग्रस्त व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी सभासद, तसेच हितचिंतकांमधून केली जात आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात (१९१५) स्थापन झालेल्या ‘स. भु’ला पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी नावारूपास आणले. त्यांच्या पश्चात त्यांच्याच काही अनुयायांकडून आज ही संस्था चालवली जाते. घटनेनुसारच कारभार चालला आहे. त्यानुसार मागील वर्ष सरता सरता झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत उलथापालथ झाली नाही, पण सर्वसाधारण सभासदांमधून नाममात्र मते घेऊन नियामक मंडळावर आलेले डॉ. अशोक अनंत भालेराव यांचा नंतर नियामक मंडळांतर्गत झालेल्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. संस्थेच्या सभासद-हितचिंतकांत या पराभवाची बरीच चर्चा झाली. त्यानंतर नियामक मंडळ सदस्यांतून सहसचिवांच्या नियुक्ती करताना भालेराव गटाच्या मानल्या जाणा-या सुरेश कुलकर्णी व अन्य सदस्यांना बाजूला सारून संस्थाध्यक्षांनी डॉ. श्रीरंग देशपांडे, राम भोगले, ज्ञानप्रकाश मोदाणी, जुगलकिशोर धूत ही ‘नवी टीम’ सहसचिवांच्या रूपात आणली. या बदलाचे सभासद-प्राध्यापक-शिक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
या बदलाच्या पाश्र्वभूमीवर प्रजासत्ताकदिनी संस्थेच्या परिसरात वेगळे दृश्य दिसले. गोविंदभाईंच्या नंतर प्रजासत्ताकदिन सोहळय़ाकडे न फिरकलेले अनेक सभासद यंदा ध्वजवंदनास हजर होते. अॅड. उदय बोपशेट्टी, अरुण रामचंद्र मेढेकर ही त्यातली काही ठळक नावे. त्याच वेळी सत्तास्थानावरून दूर फेकले गेलेले अशोक भालेराव, सुरेश कुलकर्णी, प्रकाश जेहूरकर यांची गैरहजेरी ठळक जाणवली.
२००८मध्ये स. भु. शिक्षण संस्थेच्या निवडणुकीनंतर अशोक भालेराव हे संस्थेचे सरचिटणीस झाले. अनंतरावांच्या पुण्याईने अधिकारपदावर आलेल्या अशोक यांनी संस्थेत धडाकेबाज कारभार केला. खुद्द गोविंदभाईंनी अतिशय साध्या कार्यालयात बसून संस्थेचा प्रचंड विस्तार केला. पण भालेरावांनी संस्थेच्या कार्यालयास ‘कॉर्पोरेट’ रूप दिले. त्याच वेळी जुन्या प्रथा, परंपरा व ‘आदर्श’ गुंडाळून केलेल्या कारभाराची संस्थेच्या सभासद-हितचिंतकांत दबक्या सुरात चर्चा होत होती, पण नियामक मंडळातील पदाधिकारी-सदस्यांनी त्या वेळी मौन धारण केले होते.
आता संस्थेच्या नियामक मंडळ पदाधिका-यांत मोठे फेरबदल झाल्यानंतर भालेराव यांच्या काळातील वादग्रस्त बाबी उघड केल्या जात आहेत. संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांतील क्रीडाप्रकारांना चालना देण्यासाठी भालेराव यांनी सुरू केलेली क्रीडा अकादमी, तिच्यावर खेळाशी संबंध नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाची नियुक्ती असो किंवा काही वर्षांपूर्वी १५ शिक्षकांच्या नियुक्तीचा विषय, नव्या पदाधिका-यांपुढे त्याबद्दल वस्तुस्थिती मांडली जात आहे.
संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांतील क्रीडाशिक्षकांकडे क्रीडा अकादमीविषयी विचारणा झाली, त्या वेळी या मंडळींनी ही ‘अकादमी’ नको असे संस्थेच्या पदाधिका-यांसमोर सांगितल्याचे समजते. भालेराव यांनी त्यांच्या काळात प्राचार्य-मुख्याध्यापकांना दुय्यम ठरवत काही अनाकलनीय प्रयोग केले. ‘विद्यार्थी समन्वयक’ हा एक प्रयोग होता, तो नव्या पदाधिका-यांनी तात्काळ बंद करावा, अशी मागणी काही प्राध्यापकांनी केली. मागील ५ वर्षांत संस्थेत मोठय़ा ‘अर्थपूर्ण’ भानगडी झाल्या. त्यांची स्वतंत्र समिती नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काही सभासदांकडून पुढे आली आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून परिश्रमातून स्थापन झालेल्या व मराठवाडय़ाच्या शैक्षणिक विश्वात लोकादरास पात्र ठरलेल्या या संस्थेची शताब्दी सुरू झाली आहे. शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी नूतन अध्यक्षांनी स्वतंत्र समिती स्थापण्याची प्रक्रिया सुरू केली. मधल्या काळात संस्थेतल्या एकाधिकारशाहीमुळे दुरावलेले काही सभासद आता स्वेच्छेने मुख्य प्रवाहात येत असून ‘अशोकपर्व’ संपुष्टात आल्यानंतर संस्थेंतर्गत दिसून येत असलेला बदल लक्षणीय आहे.