स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी येत्या २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करून सविनय कायदेभंगाला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती विदर्भ जॉइंट अॅक्शन समितीचे अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भ जॉइंट अॅक्शन समितीचे जिल्हा संयोजक किशोर पोतनवार यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भवाद्यांची येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर चटप यांनी ही माहिती दिली. २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार झाला. या कराराला ६० वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या कराराप्रमाणे शासकीय सेवेत २३ टक्के प्रतिनिधित्व विदर्भातील तरुणांना देण्याचे ठरले होते. अर्थसंकल्पात २३ टक्के निधी विदर्भासाठी राखीव ठेवायचा होता. मात्र, आजवर यातील काहीच झाले नाही.
दांडेकर समितीने विदर्भाच्या अनुशेषाबाबत झणझणीत अंजन टाकले आहे. वनसंवर्धन कायद्यामुळे अनेक प्रकल्प, रेल्वे मार्ग, रस्ते रखडले आहेत.
वन आम्ही सांभाळायचे आणि लाभ मात्र उर्वरित महाराष्ट्राला होत आहे.
परिणामी, येथे उद्योग आले नाहीत. त्यामुळे नक्षलवाद वाढला. छोटय़ा राज्यात नक्षलवाद वाढतो, याला काही अर्थ नाही. उलट, विकसित भागात नक्षलवाद नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या अकरा वर्षांत देशात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ३२ हजार या पूर्व विदर्भातील आहेत. हिंदी भाषकांची नऊ राज्ये असताना मराठी भाषकांच्या दोन राज्यांसाठी अडचण काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्रासोबत राहून आता विदर्भातील जनतेचा विकास शक्य नाही. येत्या २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी केली जाईल. त्यानंतर सविनय कायदेभंगाला प्रारंभ होईल. मोटर अॅक्ट कायद्याचा भंग करून गाडय़ांवरील क्रमांकही आता ‘व्हीडी’ या नावाने नोंदविले जाईल. ठिकठिकाणी स्वतंत्र विदर्भ राज्याचे फलक लावण्यात येणार आहेत, असे चटप यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला रमेशचंद्र राऊत,
डॉ. भगत, सुभाष डांगे, बबनराव फंड, राजू भगत, बाजीराव उंदिरवाडे, मयूर राईकवार, प्रा. अनिल ठाकूरवार, महबूब शेख शहाबुद्दीन, आनंद अंगलवार, बाळासाहेब खोब्रागडे, रवींद्र रायपुरे, कवडू येनप्रेडीवार, श्रीहरी बलकी, सुरेश रामगुंडे, प्रमोद सोरते, अंकुश वाघमारे उपस्थित होते.