आगामी गळीत हंगामात कारखान्यास येणा-या उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर न दिल्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. तर ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रविवारपासून कागल तालुक्यातील केनवडे येथून जेलभरो आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तुरंबे (ता. राधानगरी) येथे शिवसेनेच्या वतीने सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात शेतकरी ऊस परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी देवणे बोलत होते.    
बिद्री-भोगावतीबद्दल देवणे म्हणाले, निवडणुकीपुरता दर देणारे आमदार के. पी. पाटील आता दराबद्दल का बोलत नाहीत. साखरेच्या दराबाबत ते म्हणाले, कारखानदार व व्यापारी यांच्या तडजोडीमुळेच साखरेचे भाव गडगडतात. आता नाबार्डचा आधार घेत मूल्यांकन घटवून ऊसदर पाडण्याचे कारस्थान चालू आहे. सरकारच्या मूल्यांकनास शिवसेना भीक घालणार नाही. गतवर्षीपासून ऊसदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. या वेळी असा प्रयत्न झाल्यास शिवसैनिक पोलिसांचे कपडे काढून रस्त्यावर फिरवतील, असा सज्जड दमही देवणे यांनी या वेळी दिला. जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कामगारमंत्री हसन मुश्रीफ हे साखर घोटाळय़ाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करतात, मग गृहमंत्र्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समितीतील घोटाळे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना कोणी फसविले याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी प्रवीण सावंत, कागल तालुकाप्रमुख संभाजी भोकरे, तानाजी चौगले, मधुकर पाटील, प्रकाश पाटील, सुषमा चव्हाण यांची भाषणे झाली. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
चौकट १- असे होणार आंदोलन. १० नोव्हेंबर – जेलभरो आंदोलन, केनवडे फाटा (ता.कागल).    १२ नोव्हेंबर – भडगाव (ता.गडहिंग्लज).१३ नोव्हेंबर – साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर ढोल-ताशा आंदोलन.
ऊस परिषदेतील ठराव.प्रतिटन ३५०० रुपये दर घेणार. कारखान्याचे वजनकाटे इंटरनेटला जोडावेत. शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन द्यावी.    दौलत व अप्पासाहेब नलवडे कारखान्यांवर प्रशासक नेमावे. बंद साखर कारखाने खासगी मालकांना विकू नयेत यासह दहा ठराव मंजूर करण्यात आले.