शहरात विविध प्रकारच्या प्रदर्शनांसाठी गरूड मैदान उपलब्ध नसल्याने  पांझरा काठावरील मोकळे होणारे बगिचा आरक्षित मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी नागरी सेवा सुविधा समितीचे निमंत्रक योगेंद्र जुनागडे यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सुमारे २० कोटी रुपये किंमतीच्या महसूल विभागाच्या या भूखंडावर मनपाचे बगिचा व पार्कीग आरक्षण आहे. सदर जमीन मनपासाठी संपादन करण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी जाहीर केले असल्याने या प्रक्रियेस वेग द्यावा, तसेच जमीन मनपाने संपादित करावी अशी मागणी जुनागडे यांनी १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे. त्यानंतर या जमिनीवरील अवैध अतिक्रमित स्टॉल तीन डिसेंबपर्यंत काढण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला होता. या आदेशास मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली. भविष्यात या जागेचा उपयोग समस्त धुळेकरांना सार्वजनिक कामासाठी व्हावा, या उद्देशाने पालिकेने ही जागा ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गरूड मैदानावर व्यावसायिक संकुलाचे बांधकाम झाल्याने ही मैदाने यापुढे कार्यक्रमांना देण्याचे बंद करण्यात आले. जागा शासनाने त्वरित धुळे मनपास हस्तांतरीत करावी, अशी मागणी जुनागडे यांनी केली आहे.