विनाअनुदानित माध्यमिक शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने उद्या शनिवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश प्रसिद्धिप्रमुख गुरुनाथ वांगीकर यांनी दिली.
नोव्हेंबर २००५च्या शासन आदेशाने संपूर्ण देशभर नवीन पेन्शन योजना कार्यान्वित झाली असताना १ नोव्हेंबर २००५च्या अगोदर सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती. परंतु या कर्मचाऱ्यांना नवीन भविष्यनिर्वाह वेतन खाते उघडू दिले जात नाही. तसेच यापूर्वीची जरी नेमणूक असली तरी शंभर टक्के वेतन अनुदान योजना असल्याचे सांगितले जात आहे. विनाअनुदानित शाळांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही. अनुदानित शाळांतील विनाअनुदानित तुकडय़ांची अनुदान प्राप्त यादी शासनाने जाहीर केली नाही. उच्च माध्यमिक शाळांचा ‘कायम’ हा शब्द वगळण्यात आला नाही. कायम विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनातील जाचक अटी रद्द करण्यात आल्या नाहीत. यासंदर्भात विनाअनुदानित माध्यमिक शाळा कृती समितीने शासनाकडे वेळोवेळी आवाज उठवत पाठपुरावा चालविला आहे. मात्र शासनाकडून दाद दिली जात नसल्याने आंदोलन हाती घेण्यात आल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले.