येथील श्रमिक संघाच्या कार्यालयात झालेल्या पेन्शनरांच्या बैठकीमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दि.१७ डिसेंबर रोजी येथील प्रॉव्हिडंट फंड कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती कॉ.अतुल दिघे यांनी येथे दिली.
१७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शन दिवस’ मानला जातो. कारण याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन ही पेन्शनदारांना दिलेली खूशीची रक्कम नसून पेन्शन हा हक्क आहे, असे बजाविले होते. त्यामुळे याचदिवशी देशात व राज्यात सर्वत्र ही निदर्शने होणार आहेत.    पेन्शनदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांमध्ये किमान १ हजार रूपये पेन्शनवाढ ताबडतोब सर्वाना मिळाली पाहिजे, ६ हजार ५०० रूपये किमान पेन्शन असली पाहिजे, पेन्शनला महागाई भत्ता द्या, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी सोमवार दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रमिक कार्यालय येथे जमून तेथून जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे प्रॉव्हिडंट फंड कार्यालयासमोर जाऊन जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.तरी कोल्हापूर जिल्हा व शहर परिसरातील सर्व पेन्शनदारांनी प्रचंड संख्येने जमून निदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमिक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.