नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारानंतर खडबडून जागा झाला आहे. महापौर आयुक्तांनी सफाई मोहिमेबरोबरच पाहणी दौरे करून आजार नियंत्रणासाठी कंबर कसलेली असतानाच महापालिकेने तलावात सोडलेल्या गप्पी माशांची चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. यामुळे प्रशासनाची नवी डोकेदुखी वाढली आहे. चोरीला जाणाऱ्या माशांची विक्री केली जात आहे.
नवी मुंबई शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्राथमिक रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेदेखील या आजारांच्या रुग्णांनी व्यापली गेली आहेत, तर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने आणि महापौर आयुक्तांनी मागील आठवडय़ात पाहणी दौऱ्यातून विविध प्रभागांचा आढावा घेतला. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सफाई मोहीम हाती घेतली. सफाई मोहिमेबरोबरच डेंग्यू व मलेरियाच्या डासांचे उत्त्पती केंद्र असलेल्या डबके आणि तलावाच्या परिसरामध्ये पालिका प्रशासनाने गप्पी मासे सोडले आहेत. गप्पी माशांमुळे पाण्यामध्ये डासांची होणारी उत्त्पत्ती कमी होते. त्याचबरोबर डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या डासांची पैदास रोखली जाते. या आजाराचा रक्षक मानल्या जाणाऱ्या गप्पी माशांची तलावातून चोरी होत असल्याचा प्रकार सध्या उघडकीस येत आहे. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखरणे आदी परिसरांतील डबके आणि तलावात टाकण्यात आलेले गप्पी मासे काही मच्छीमारांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे महापालिकेने तलावात टाकलेले गप्पी मासे यांची संख्या वाढण्यापूर्वीच चोरीमुळे घटली आहे. या चोरांवर नियंत्रण ठेवायचे कसे आणि कोणी, असा प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. ‘गप्पी मासे पाळा आणि मलेरिया, डेंग्यू टाळा’ असे म्हणण्याऐवजी आता ‘गप्पी मासे शोधू कुठे’ अशी अवस्था पालिका प्रशासन आणि नागरिकांची झाली आहे. या प्रकाराबाबत विचारणा केली असता एका अधिकाऱ्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमायचे कसे, असा सवाल करत हा प्रकार सुरू असल्याची कबुली दिली. याबाबत महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, हे मासे नागरिकांसाठी महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या माशांची चोरी होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माशांची विक्री करण्याचा नवा धंदा
 घरांमध्ये असणाऱ्या फिश टँकमधील माशांना खाद्य म्हणून गप्पी मासे वापरले जातात; परंतु काही विक्रेते तलावातील मासे काढून परस्पर विक्री करत आहेत. १० ते २० रुपयांपर्यंत ते विकले जात आहेत.