बागलाण तालुक्यात ताहाराबादसह इतरत्र डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना स्थानिक पातळीवर या आजाराच्या फैलावाकडे पुरेशा गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. केवळ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली ज्या परिसरात विशेष अस्वच्छता नाही, त्या ठिकाणी स्वच्छतेचा देखावा केला जात आहे. अनेक गावांमध्ये स्वच्छतेच्या नावाने बोंब असून अनेक दिवसांपासून घरात पाणी साठविलेले राहात असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यासाठी ते पूरक ठरू शकतात. या पाश्र्वभूमीवर सर्व ठिकाणी ग्रामपंचायतींनी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विशेषत: ताहाराबाद, अंतापूर, भिलवाड, तुंगणदिगर, दसवेल, कातरवेल, पिंपळकोठे, दरेगाव, भडाणे, सोमपूर, लाडूद या भागात डेंग्यूसदृश्य आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात असलेली अस्वच्छता आणि डेंग्यूविषयी जागरूकतेचा अभाव ही दोन कारणे त्यासाठी महत्वपूर्ण मानली जात आहेत.
आजाराचे लोण बागलाण तालुक्यातील इतर गावांमध्येही पसरले आहे. त्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी त्वरीत कठोरपणे उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतींची जबाबदारी त्याअंतर्गत अधिक वाढली आहे. ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादूर्भाव नेमका कशामुळे होतो, याविषयी अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी जागृतीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत वरील सर्व गावांमध्ये डास, मच्छरांची उत्पत्ती अधिक प्रमाणावर होत आहे. डेंग्यूची लागण डासांपासून होत असल्याने त्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वच्छता मोहिमेंर्तगत गांभीर्य ठेवण्याची गरज आहे. स्वच्छतेबाबत अजूनही मोठी उदासीनता दिसून येत असल्याचे चित्र आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पक्क्या गटारींचे बांधकाम झालेले नाही. ताहाराबाद परिसरात १०० खेडी असून त्या सर्वाच्या मध्यस्थानी हे गाव आहे. येथील आठवडे बाजारात दर रविवारी हजारो लोक येत असतात. आठवडे बाजारात सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठी चारी आहे. येथे कायम दरुगधी राहात असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती गावातील अनेक भागात आहे. मात्र वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
गावातील उघडय़ावर पडणारा कचरा, गटारींमधून काढण्यात येणारी घाण, साचलेले पाणी यांची वेळीच विल्हेवाट लावली गेली पाहिजे. आठवडय़ातून एकदा तरी गावात धूर फवारणी करावी, अशी किमान अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत. आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती मोहीम हाती घ्यावी. त्यादृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम सुरू असले तरी त्यात अधिक सक्रियता आवश्यक आहे.
ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक असुविधा आहेत. त्या दूर होण्यासाठी येथे ग्रामीण रुग्णालय होण्याची गरज निर्माण झाली आहे.