समाजातील व्यसनाधिनता वाढल्याने विकास खुंटला असून त्याला हद्दपार करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट विचार अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी आर्णी येथे आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केले.
येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये राज्यस्तरीय बंजारा लेंगी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मनोहर नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. बंजारा समाजातील सामाजिक परंपरा कायम राहावी, त्या दृष्टीने या राज्यस्तरीय लेंगी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल नाईक यांनी आयोजकांची स्तुती करून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शिवाजीराव मोघे यांनीही समाज सुदृढ होण्यासाठी निव्र्यसनी असण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे संतांच्या विचारांचा आरसा समोर ठेवून कार्य केल्यास समाजाची निश्चितच प्रगती होते, असे स्पष्ट करून संत सेवादास महाराजांचे विचार मनाशी बाळगले तर अनेक समस्यांवर मार्ग मिळू शकतो, असे विचार आपल्या उद्घाटन भाषणातून मांडले.
राज्यस्तरीय बंजारा लेंगी स्पर्धा २४ व २५ मार्च या दोन दिवशी आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात असंख्य संघांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष अनिल आडे यांनी केले होते. कार्यक्रमास डॉ. टी.सी. राठोड, रामजी आडे, प्रेमदास महाराज, राजुदास जाधव, भरत राठोड यांनी विचार मांडले. कार्यक्रमाला एन.टी. जाधव, जीवन जाधव, शंकर राठोड, डॉ. रामचरण चव्हाण, जितेंद्र मोघे, इंद्रनील नाईक, वनमाला राठोड आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. प्रास्ताविक राजुदास जाधव व अनिल आडे यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.
वेगवेगळ्या रंगभूषेत अनेक संघांनी समाजातील परंपरेला उजाळा दिला. वामनराव नाईक जन्मशताब्दी पर्वानिमित्त या दोन दिवसीय महोत्सवाचा यशस्वी समारोप झाला.