सोलापूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण अर्थकारणाचे तथा राजकारणाचे प्रमुख सत्ताकेंद्र मानल्या गेलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत कलह वाढला आहे. विशेषत: मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील नेत्यांतील वैमनस्य उघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा माढा लोकसभा मतदारसंघ याच सोलापूर जिल्ह्य़ात असताना पक्षात एकजिनसीपणा निर्माण होण्याऐवजी बेदिली माजली आहे. या बिघाडीच्या राजकारणामुळे नजीकच्या काळात पक्षातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार की काय, अशी शंका वर्तविली जात आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हे प्रमुख दावेदार होते. एवढेच नव्हे तर त्यांना अध्यक्षपद मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या बुजूर्ग नेत्याला सूचना केली होती. परंतु ऐनवेळी संचालकांच्या बैठकीत राजन पाटील यांचे नाव सुचविण्याबाबतचा शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. पक्षातील या गटबाजीचा लाभ दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांना झाला व त्यांच्या गळ्यात आयत्या वेळी अध्यक्षपदाची माळ पडली. या घडामोडीत राष्ट्रवादीअंतर्गत बेबनाव उफाळून आल्याचे दिसून येते.
बँकेच्या अध्यक्षपदी राजन पाटील यांचीच निवड होणार या विश्वासाने मोहोळ तालुक्यातील पाटील समर्थक जल्लोष करण्याच्या तयारीने सोलापुरात आले होते. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी अन्याय झाल्याचा मुद्दा रेटत पदांचे राजीनामे दिले आहेत. राजन पाटील यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी आपल्या पिताजींना डावलले गेल्याबद्दल पंढरपूरचे नेते सुधाकर परिचारक यांच्यावरच थेट निशाणा साधला. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून राजन पाटील व परिचारक यांच्यात तीव्र मतभेद आहेत. परिचारक यांच्या भूमिकेबद्दल बाळराजे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करीत परिचारक यांना ‘ईट का जबाब पत्थरसे’ देण्याचा इशारा उघडपणे दिला आहे. अशाप्रकारे पाटील-परिचारक मतभेद चव्हाटय़ावर आले असताना परिचारक गटाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळत राजन पाटील यांना अध्यक्षपद मिळाले नाही, यात आपला कोणताही दोष नसल्याचा निर्वाळा दिला आहे. परिचारक यांनी सलग आठ वर्षे सांभाळलेले एसटी महामंडळाचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका क्षणात काढून घेऊन ते आपले नजीकचे सोयरे, उस्मानाबादचे जीवन गोरे यांना बहाल केले. परिचारक यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार भारत भालके यांनीही अलीकडे अजित पवार यांच्याशी संपर्क वाढविला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या परिचारक यांची अवस्था ‘ना घरका ना घाट का’ अशीच राहिल्यामुळे राष्ट्रवादीत का बरे राहायचे? ‘हेची का फळ, मम तपाला’ असा सवाल परिचारक समर्थक करीत आहेत. तर दुसरीकडे सलग तीनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे देखील नाराज आहेत. विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत त्यांचा मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांची आमदारकी गेली. जिल्हा बँकचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणे अपेक्षित होते. परंतु पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली आहे.