इमारतींची अवस्था योग्य नसल्याच्या कारणास्तव जिल्ह्यातील ४५ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलण्याचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक शाखेने तयार केला आहे. बदलविली जाणारी ही मतदान केंद्र आधीच्या मतदान केंद्रालगतच असतील याची दक्षता घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासह धुळे लोकसभा मतदार संघातील काही भागाचा समावेश होतो. निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २४ एप्रिलला मतदान होणार असल्याने जिल्हा निवडणूक शाखा खऱ्या अर्थाने कामास लागली आहे. जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ४,१९१ मतदान केंद्र आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १,७५० मतदान केंद्र दिंडोरी लोकसभा मतदार संघात आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघात १,६६४ मतदान केंद्र असून धुळे लोकसभा मतदार संघाची ७७७ मतदान केंद्राचाही त्यात अंतर्भाव होतो. निवडणूक आयोगाने आधीच मतदान केंद्रांचा आढावा घेण्याचे सूचित केले होते. अंध व अपंग मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रावर सहजपणे पोहोचता येईल, त्या ठिकाणी पाणी व प्रसाधन गृहाची व्यवस्था आदींचे अवलोकन करून छायाचित्रण करण्यास निवडणूक आयोगाने सांगितले होते. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचा विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेताना काही केंद्रांच्या इमारतींची स्थिती योग्य नसल्याचे निष्पन्न झाले. मतदान केंद्राची स्थळ निश्चित करताना प्राधान्याने शालेय इमारतींची निवड केली जाते. या ठिकाणी आवश्यक त्या प्रमाणात खोल्या, आसपासच्या मैदानामुळे सभोवताली मोकळा परिसर सहजपणे उपलब्ध असतो. काही मतदान केंद्रांच्या इमारतींची अवस्था योग्य नसल्याने तर काही ठिकाणी जुनी शाळा गावातील नव्या इमारतीत स्थलांतरीत झाल्यामुळे मतदान केंद्राचे स्थळ बदलविणे अपरिहार्य ठरल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गितांजली बावीस्कर यांनी सांगितले.
जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्यातील या स्वरुपाची ४५ मतदान केंद्रांचे स्थळ बदलविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मतदान केंद्रांचे ठिकाण बदलताना आधीच्या केंद्राच्या परिसरात ते राहील याचीही दक्षता घेतली जाणार आहे. या प्रस्तावाला निवडणूक आयोगाची मान्यता घेणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचे सांगितले जाते.
मतदान केंद्राचे स्थळ बदलविण्यापूर्वी त्याबाबतच्या हरकती मागविल्या जातील. हे सोपस्कार पार पडल्यानंतर उपरोक्त मतदान केंद्रांचे स्थळ बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
जिल्ह्यातील ४५ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलणार
इमारतींची अवस्था योग्य नसल्याच्या कारणास्तव जिल्ह्यातील ४५ मतदान केंद्रांची ठिकाणे बदलण्याचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक शाखेने तयार केला आहे.

First published on: 01-04-2014 at 07:31 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District 45 voting centers places will be changed