दोनदा लांबणीवर पडलेली जिल्हा नियोजन समितीची अर्थात, ‘डीपीसी’ची बठक पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दोन तासांच्या आतच आटोपण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. जिल्ह्य़ाच्या विकासाची वाहिनी म्हणून अत्यंत महत्वाची असलेल्या या बठकीला आटोपते घेण्यात आल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदार आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे बठक किमान चार तास चालली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी गेल्या वर्षांतील जिल्हा वार्षकि योजनेअंतर्गत झालेल्या  खर्चाला मान्यता देण्यात आली, तसेच या आíथक वर्षांतील योजनेअंतर्गत खर्चाचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी सर्वसाधारण  योजनेअंतर्गत १७० कोटीचा आराखडा आता १८० कोटी रुपयांचा झाला आहे. आदिवासी उपयोजना आराखडा ११९ कोटीवरून १४२, तर अनुसूचित जाती उपयोजनेचा आराखडा ३३.९८ कोटीवरून ४९.४३ कोटीवर गेल्याचे ते म्हणाले. यावेळी काही सदस्यांनी विहीर वाटपात त्रुटी  असल्याचे सांगितले. हरित क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी व जलसंधारण क्षेत्रात भरीव योगदान आहे. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्य नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासोबतच जिल्ह्य़ात उभारण्यात  येत असलेल्या बायोडाव्‍‌र्हसिटी पार्कला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण ठराव जिल्हा नियोजित समितीच्या आजच्या आढावा  बठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री नितीन राऊत यांनीच सदर दोन्ही प्रस्ताव सादर केले.
आमदार माणिककराव ठाकरे यांच्यासह सर्वानुमते नियोजन समितीच्या सदस्यांनी या ठरावास मान्यता दिली. बठकीला पालकमंत्र्यांसह आमदार वसंत पुरके, खासदार हंसराज अहीर, खासदार सुभाष वानखडे, आमदार संदीप बाजोरिया, आमदार संजय राठोड, आमदार नंदिनी पारवेकर, जिल्हा परिशद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यपालन अधिकारी नवलकिशोर राम, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांवर ‘दादागिरी’ चा आरोप
जिल्ह्य़ाच्या विकासाचे नियोजन करीत असतांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मते विचारात घेणे गरजेचे असतांना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री इतर सदस्यांसोबत सभेत दादागिरीने वागतात. त्यांना जिल्ह्य़ाप्रतीच आत्मियता नसून प्रत्येक बठकीवर अतिक्रमण करीत ते दुसऱ्याचे काहीही ऐकून घेत नसल्याचा आरोप मंगळवारी भाजपचे खासदार हंसराज अहीर व शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांनी केला. १६ तालुक्यांचा जिल्हा असतांना घाईगडबडीत दीड तासात बठक आटोपून जिल्ह्य़ातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार पालकमंत्र्यांकडून होत असून पुढची बठक त्यांनी सुरळीत न घेतल्यास शिवसेना स्टाईल म्हणजे काय ते दाखवून देऊ, असा खणखणीत इशाराही खासदार वानखेडे यांनी विश्राम भवनावर पत्रकारांशी बोलतांना दिला. खासदार हंसराज अहीर म्हणाले की, १६ तालुक्यांचा जिल्हा तब्बल ९ लाख ६० हजार ५०० हेक्टरवर शेतीचे नियोजन, मात्र पालकमंत्री एवढय़ा मोठय़ा जिल्ह्य़ासाठी एक दीड तासच देतात, ही जनतेची थट्टा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी, खरडी, रस्त्याची दुरावस्था, केंद्र व राज्य शासनाने विकासकामांसाठी दिलेला निधी, यावर साधकबाधक चर्चा न होता सभा गुंडाळली जाते.
कोणत्याही अन्य सदस्यांना नियोजन समितीत विषय मांडण्याची संधी मिळत नसल्याचे मी आज बघितले असून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे खासदार अहीर म्हणाले. विश्रामगृहात येऊन जिभेचे चोचले पुरविण्यासाठीच त्यांची मिटिंग असते, असे म्हणत ‘तुम्ही  काहीही खा. पण, जनतेच्या विकासाकडे बघा, असा टोलाही त्यांनी पालकमंत्र्यांना लगावला.