लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शहरातील विविध भागांत दिवाळीनिमित्त विविध संस्थांतर्फे मराठी, हिंदी गीतांचे कार्यक्रम सादर करून रसिकांना सांगीतिक फराळाची मेजवानी दिली.
चार भिंतीच्या आत बंदिस्त जीवन जगणारे बंदिवान परिवारासोबत दिवाळी साजरी करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनातील हुरहूर कमी करण्याचा प्रयत्न दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. स्वरवेध संस्थेच्या कलावंतांनी मध्यवर्ती कारागृहात कार्यक्रम सादर करून एकापेक्षा एक सरस गीतांची जणू मेजवानी दिली. महागायक अनिरुद्ध जोशी, निरंजन बोबडे, श्रीनिधी घटाटे आणि रसिका चाटी यांनी यावेळी नाटय़गीत, अभंग, कव्वाली, भावगीते सादर केली. गणेशाची आराधना झाल्यावर शिरडी वाले साईबाबा, आओ हुजूर, यँू तो हमने लाखों हसी देखे, सुनो सजना, परदा है परदा आदी गीते सादर केली. कारागृहातील कैदी अमित गांधी, वासुदेव ताकसोडे यांनीही यावेळी गीते सादर केली. कारागृह अधीक्षक विनोद शेकदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला रेवती कन्स्ट्रक्शनचे दीपक निलावार, स्वरवेदचे अॅड. भानुदास कुळकर्णी, संजय भाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमातील गायक-गायिकांना सचिन बक्षी, अरविंद उपाध्ये, प्रवीण लिहीतकर, सुभाष वानखेडे आणि श्याम ओझा यांनी साथसंगत केली.  
कलासंगम संस्थेतर्फे रेशिमबाग परिसरातील उद्यानात लातुरच्या स्मिता आजेगावकर यांचे कीर्तन आणि पहाट वारा या मराठी हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरकचतुर्दशीच्या निमित्ताने स्मिता आजेगावकर यांनी नरकासुराचा वध या विषयावर कीर्तन केले. शिरीष भालेराव, दीपक फडणवीस यांनी कीर्तनाला साथसंगत केली. दुसऱ्या दिवशी पहाटवारा या कार्यक्रमांतर्गत निरंजन बोबडे, मंजिरी वैद्य, श्रीनिधी घटाटे यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. यावेळी संगीतकार आणि गायक एम.ए.कादर आणि झीनत कादर यांनी गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. छोटू भोयर, ओंकार पालांदूरकर, अतुल सेनाड, माजी नगरसेवक आनंदराव गायधने, डॉ. अनिल उपगडे, डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर उपस्थित होते.
स्वरवेद संस्थेतर्फे गोरक्षण सभेमध्ये गायत्री कानिटकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी यावेळी राग अहीर भैरव, बैरागी भैरव सादर करून रसिकांना स्वरांचा आनंद दिला. कार्यक्रमात कवी सातफळे व प्रवीण देशपांडे यांनी साथसंगत केली.