लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांची कमतरता नाही. साता-यातून उमेदवार कोण? म्हणून कोडय़ात पडणे गैर असून, रामराजे निंबाळकर लढण्यासाठी तयार आहेतच पण, शरद पवारांनी सांगितल्यावर पालकमंत्री शशिकांत शिंदेही नकार देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर यांनी पडद्याआडची गणिते मांडताना, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला विरोधकांकडून नव्हेतर, घरभेद्यांकडूनच आव्हान असल्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल असे मत व्यक्त केले.
कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष नामदार रामराजे निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, राजेश पाटील-वाठारकर यांची उपस्थिती होती.
रामराजे निंबाळकर म्हणाले, की शरद पवार साता-यात आले होते. त्या वेळी सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी तवा रिकामाच आहे, असे स्पष्ट केले असल्याने त्यांच्या मनात काय आहे हे कार्यकर्त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे उमेदवारीचे सर्वाधिकार त्यांना देण्यास हरकत नाही.
शशिकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे सतत बदलत असून, देशाला अन् राज्याला दिशा देण्याचे तंत्र राष्ट्रवादी काँग्रेसला अवगत झाले आहे. परिणामी, येत्या राजकीय कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
साता-यातून उमेदवार कोण? म्हणून कोडय़ात पडणे गैर- डॉ. येळगावकर
लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांची कमतरता नाही. साता-यातून उमेदवार कोण? म्हणून कोडय़ात पडणे गैर असून, रामराजे निंबाळकर लढण्यासाठी तयार आहेतच पण, शरद पवारांनी सांगितल्यावर पालकमंत्री शशिकांत शिंदेही नकार देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर यांनी सांगितले.
First published on: 08-02-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont confuse over candidate dr yelegaonkar