दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त येत्या २९ व ३० डिसेंबरला येथे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्षपदी व्यसनमुक्ती चळवळीचे आधारवड असलेले डॉ. अनिल अवचट हे राहणार आहेत. संमेलनात देशभरातून सुमारे अडीच हजारांवर अपंग प्रतिनिधी सहभागी होतील, असा विश्वास संयोजन समितीचे अध्यक्ष मोहन माळी व कार्यवाह आनंदा मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. सुरेखा सूर्यवंशी तानाजी शेवाळे उपस्थित होते.
माजी खासदार श्रीनिवास पाटील संमेलानाचे स्वागताध्यक्ष असून, या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. २९ तारखेला सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करून व कृष्णामाईच्या जलपूजनानंतर संमेलनाची शोभायात्रा निघेल. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. डॉ. आढाव यांच्या हस्ते व डॉ. अवचट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास माजी खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा प्रा.उमा हिंगमिरे, बापूसाहेब बोभाटे उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता ‘अपंग पुनर्वसन कायदा आणि वास्तव’ या विषयावर परिसंवाद होईल. गोवा येथील अॅव्हेलिनी हे त्याच्या अध्यक्षस्थानी राहतील. सातारा येथील हेमा सोनी, पुणे येथील डॉ. संजय जैन यात सहभागी होतील. दुपारी ४ वाजता ‘अपंग वास्तव आणि भविष्य’ या विषयावर परिसंवाद होईल. कोल्हापूर येथील सोनाली नवांगूळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात ठाणे येथील प्रा. अरविंद जाधव, सातारा येथील जयंत उथळे व पुणे येथील राहुल देशपांडे त्यात सहभागी होतील. रात्री ९ वाजता दत्ता करमकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.
३० डिसेंबर सकाळी ९ वाजता ‘माझा संघर्ष’ या विषयावर आनंदा मोरे हे आपले विचार मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता ‘पुनर्वसनाची जबाबदारी समाजाची, की शासनाची’ या विषयावरील परिसंवाद होईल. जालनाचे जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सातारा येथील प्रकाश भुळगट, नागपूर येथील विजय मुनेश्वर सहभागी होतील. दुपारी १ वाजता संमेलनाचा समारोप होईल.
पुणे येथील डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करतील.  दरम्यान, अपंगांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे, पुस्तकांचे प्रदर्शन, तसेच अपंग वधूवर नोंदणी, नेत्रदान नोंदणी आदी उपक्रम होणार आहेत.