रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे यांना पोलिसांनी अटक केली. प्रियदर्शिनी सेवाभावी ट्रस्टचे संचालक व मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण इथापे यांनी डेरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
डॉ. इथापे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाच्या कारणातून काल रात्री डॉ. डेरे आपल्या घरी गेले व रिव्हॉल्व्हर दाखवून पत्नीला धमकावले. बाहेर असल्याने पत्नीने ही माहिती दिल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली व घरी गेलो. त्या नंतर रात्री ११ च्या सुमारास संतप्त झालेले डेरे पुन्हा आपल्या घरी आले व धक्काबुक्की करत रिव्हॉल्व्हर दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी काल रात्री डेरे यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दि. २० पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
डॉ. डेरे शहरात एक मोठी शिक्षण संस्था चालवितात. काही काळ भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेले डेरे नंतर शिवसेनेतही गेले होते. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. अनेक वादग्रस्त प्रकरणात ते सतत चर्चेत राहिले. आता हा नवीनच वाद उफाळला असून उपनिरीक्षक प्रवीण साळुंखे पुढील तपास करत आहेत.