कार्यकर्ते गहिवरले
प्रतिनिधी, औरंगाबाद
शोषणाची पाळेमुळे अंधश्रद्धेत दडलेली असतात, हे सोप्या सूत्रांनी समाजाला सांगणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाल्याच्या वृत्ताने मराठवाडा हळहळला. डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे वृत्त सकाळीच चळवळ्या कार्यकर्त्यांपर्यंत धडकले आणि हत्येमागे कोण असावेत, या चर्चेला उधाण आले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते जात पंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याच्या कारणामुळे हत्या झाली असावी, अशी चर्चा सुरू झाली. दुपारनंतर मराठवाडय़ात ठिकठिकाणी या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. यात विविध पक्ष संघटना सहभागी झाले.
विज्ञाननिष्ठ समाजाशिवाय समाजासमोरील समस्यांची सोडवणूक करता येणार नाही, याची जाणीव ठेवून अंधश्रद्धा निर्मूलन अभियान व विवेक वाहिनीच्या माध्यमातून दाभोलकरांनी केलेले कार्य मोठे आहे. त्यांची हत्या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा असल्याची प्रतिक्रिया गोविंदभाई श्रॉफ मानवी मूल्य संवर्धन प्रतिष्ठानचे ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी व्यक्त केली. डॉ. दाभोलकर यांच्या जाण्याने पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा म्हणाले की, ७-८ वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नगर येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आंदोलन हाती घेण्याचे ठरविले होते. तेव्हा त्यांचे बंधू पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोलकर यांनी नरेंद्रवर ते लोक हल्ला करतील, अशी भीती व्यक्त केली होती. ती तेव्हा खोटी ठरली. आज मात्र ती खरी ठरली. देवदासी, भानामती व कुप्रथांविरुद्ध चळवळ उभी करणाऱ्या या व्यक्तीला कष्टकरी व कामगारांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, असे अंतरी वाटायचे. ही त्यांच्या अंतरीची समजूत त्या हल्लेखोरांना कळाली असती तर बरे झाले असते. महाराष्ट्रात या अनुषंगाने काम करणाऱ्या ४२ कार्यकर्त्यांना निश्चित वेळेवर मानधन मिळावे, यासाठी दाभोलकर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असायचे. तरुणांमध्ये नशाबंदी व्हावी, यासाठी त्यांनी विवेक वाहिनीसारखा उपक्रम चालू ठेवला होता. आंतरजातीय विवाह घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. असे विविध रचनात्मक काम करताना त्यांनी ‘साधना’ ला चांगले स्वरूप दिले. अशा प्रकारे सामाजिक काम करणाऱ्या  कार्यकर्त्यांला ज्या हिंसक प्रकारे संपविण्यात आले, ते दुर्दैवी आहे. या पुढे दाभोलकरांचे काम पुढे चालू ठेवू.
मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ात या हत्येचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. अजित खोजरे, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. सुनीती धारवाडकर यांसह कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध केला. मराठा समाज जागृती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बनकर व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. शहरातील पैठण गेट येथे विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
दाभोलकरांचे लातूरशी अतूट नाते
वार्ताहर, लातूर
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचा लातुरात तीव्र निषेध करण्यात आला. अंनिसचे लातुरातील काम राज्यात सर्वाधिक सशक्त ठरले. लातूरवर मनापासून प्रेम करणाऱ्या दाभोलकर यांचा लातूरलाच १५ ऑगस्टला झालेला जातपंचायत निर्मूलन परिषदेचा कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातील शेवटचा कार्यक्रम ठरला.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीने लातूर जिल्हय़ात उभारलेले काम लक्षणीय ठरले. समाजाच्या विविध स्तरातील मंडळी या चळवळीत सक्रिय काम करतात. त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी अनेक कार्यकत्रे सकाळीच साताऱ्याला रवाना झाले. समितीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस माधव बावगे यांनी दाभोलकर यांच्या हत्येने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण देशभरात अतिशय सनदशीर मार्गाने अंनिसचे काम सुरू होते. दाभोलकर यांच्या हत्येमुळे चळवळीची मोठी हानी झाल्याची खंत त्यांनी साश्रुनयनांनी व्यक्त केली.
शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिरुध्द जाधव यांनी, दाभोलकर यांच्या हत्येमुळे निरलस पुरोगामी नेत्याचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली. जाधव म्हणाले की, बुद्धिवादावर चालणारी राज्यातील सर्वात सशक्त चळवळ म्हणून अंनिसकडे पाहिले जाते. त्यांच्यासारख्या अजातशत्रूवर गोळय़ा झाडून त्यांची हत्या होण्याचा प्रसंग हा महाराष्ट्राला अशोभनीय आहे. पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी, अंधश्रद्धेविरोधात देशातील पहिली चळवळ सुरू करण्याचे ऐतिहासिक काम दाभोलकरांनी हाती घेतल्याचे सांगितले. केरळ साहित्यशास्त्र परिषदेनंतर देशात दुसरी चळवळ दाभोलकरांनी तर्कशुद्ध विचारावर सुरू केली. जागतिक पातळीवर सुधारणाविषयक कामासंबंधी महाराष्ट्राची दखल दाभोलकरांमुळेच घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
दाभोळकरांनी सामाजिक कृतज्ञता निधी उभारला. साधनासारख्या साप्ताहिकाचे समर्थ संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली व आपल्या कार्यकाळात विविध अस्पíशत विषयांवर विशेषांक काढले. संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणारी घटना त्यांच्या हत्येमुळे घडली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शाहू महाविद्यालयात आज शोकसभा
अंनिसच्या वतीने उद्या (बुधवारी) सायंकाळी ४ वाजता राजर्षी शाहू महाविद्यालयात श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणीत विविध संघटनांची धरणे
वार्ताहर, परभणी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी भाकपच्या नेतृत्वाखाली अंनिस, महिला जागृती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्रात विवेकशीलता जागविण्यासाठी व धर्म-जातीच्या नावावर भोंदूपणाने होणाऱ्या पिळवणुकीविरुद्ध डॉ. दाभोलकर यांनी जीवन वेचले. जादूटोणा विरोधी विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी अनेकदा धमक्याही दिल्या. त्यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट आहे, असा आरोप भाकपने केला. भाकपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कॉ. राजन क्षीरसागर, अॅड. माधुरी क्षीरसागर, डॉ. मानवतकर, प्रा. सुनील मोडक, रामराव जाधव, संदीप सोळंके, डॉ. वानखेडे, सचिन देशपांडे, गणपत गायकवाड, शेख अब्दुल, गजानन देशमुख, रंगनाथ चोपडे, अरुण राऊत आदी यात सहभागी झाले.
माकपतर्फे निषेध
दिवसाढवळ्या डॉ. दाभोलकर यांचा खून होतो, याचा अर्थ राज्यात कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही, असे माकपने म्हटले आहे. मारेकऱ्यास तत्काळ अटक करावी व डॉ. दाभोलकर आग्रही होते तो कायदा तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी माकपने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली. निवेदनावर कॉ. विलास बाबर, कॉ. अंजली बाबर, कॉ. शेख महेबुब, कॉ. कीर्तीकुमार बुरांडे, अशोक कांबळे, पंडित गोरे, सुरेश लबडे, एल. डी. कदम, शेख शब्बीर, सटवाजी गोरे, उद्धव ढगे, गणेश लोखंडे आदींच्या सह्य़ा आहेत.
अंनिस जिल्हा शाखेचे निवेदन
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा अंनिसच्या येथील शाखेने निषेध केला. अध्यक्ष डॉ. रवींद्र मानवतकर, कार्याध्यक्ष बी. व्ही. राके, सचिव प्रसन्न भावसार, सल्लागार प्रा. सुनील मोडक, सुधीर सोनुनकर, कैलास सुरवसे, रणजित कारेगावकर, प्रवीण वायकोस, दीपक िशदे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
‘परिवर्तन चळवळीतील संयमी वाहकास मुकलो’
वार्ताहर, जालना
नरेंद्र दाभोलकर यांच्या रुपाने साने गुरुजी, यदुनाथ थत्ते यांनी सुरू केलेल्या संयमी परिवर्तन चळवळीच्या वाहकास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते प्रा. बी. वाय. कुळकर्णी यांनी श्रद्धांजली वाहिली.
प्रा. कुळकर्णी म्हणाले की, दाभोलकर नितळ मनाचे व विचारांमध्ये स्पष्टता असणारे कार्यकर्ते होते. अपायकारक अंधश्रद्धा व कर्मकांडाविरोधात भूमिका घेण्यामागे त्यांचा हेतू समाज शुद्धीकरणाचा होता. जादू-टोणा विरोधी विधेयक राज्य विधिमंडळात संमत व्हावे, यासाठी ते आग्रही असले तरी काही मंडळींनी या विधेयकासंदर्भात अकारण गैरसमज निर्माण केले होते. त्यांच्या आपल्यातून जाण्यामुळे अंधश्रद्धा विरोधी चळवळ भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामगार नेते अण्णा सावंत म्हणाले की, दाभोलकर यांनी संघर्ष करताना आव्हानांची फिकीर कधी केली नाही. तसा त्यांचा स्वभाव नव्हता. अघोरी प्रथा व जादू-टोणा आदी अनिष्ट बाबींना विरोध करून समाजजागृतीचे काम त्यांनी केले. बाबा आढाव यांच्यासोबत राज्यातील एक गाव एक पाणवठा चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून परिवर्तनवादी व समाजसुधारणेचाच विचार केला.
साने गुरुजी कथामालेचे जिल्ह्य़ातील प्रमुख कार्यकर्ते दत्तात्रय हेलसकर म्हणाले की, दाभोलकर आपल्यात नसल्यामुळे कथामालेची मोठी हानी झाली आहे. आपल्या आचार-विचाराने, तसेच कर्तृत्वाने साने गुरुजींचे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अध्वर्यू व परिवर्तनवादी विचाराच्या संपादकास आपण मुकलो आहोत.
नांदेडला मूकमोर्चा
वार्ताहर, नांदेड
साधनाचे संपादक व पुरोगामी चळवळीतील कृतिशील कार्यकत्रे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त येताच त्यांचे चाहते, हितचिंतकांना मोठा धक्का बसला. जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मूकमोर्चा काढून निषेध केला.
डॉ. दाभोलकर व नांदेडचा ऋणानुबंध होता. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी त्यांनी अनेकांना जोडून घेतले होते. शिवाय चळवळीत काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सुख-दुखात ते नेहमीच सहभागी होत असत. एखाद्या कार्यकर्त्यांला उपचारासाठी आíथक मदत, अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण त्यांनी वेळोवेळी केली. कॉ. प्रदीप नागापूरकर यांचा त्यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध होता. शिवाय कामगार नेते बळवंत मोरे चळवळीतही त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.
सहा-सात वर्षांपूर्वी दाभोलकरांनी अचानक अभंग पुस्तकालयाला भेट दिली. तेव्हा हा उपक्रम पाळण्यात असल्यासारखा होता. पण छोटय़ाशा भेटीत दाभोलकरांनी पाळण्यातून बाहेर पडल्यावर चालायचे कसे, मग पळायचे कसे याचे काही धडे दिले. सध्या मीडिया सेंटरच्या धर्तीवर जास्तीत जास्त पुस्तकांची मांडणी करण्याचा सल्ला त्यांनी त्या भेटीत दिला. महाराष्ट्रातील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना काही प्रमाणात आíथक आधार देता यावा, या साठी मोठा निधी उभारण्यात दाभोलकरांचा पुढाकार होता. त्यांना स्वतला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला देऊन टाकण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला, ही आठवण समितीचे नांदेडचे सचिव प्रा. शिवदास हमंद यांनी सांगितली. जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची भेट घेऊन दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध तत्काळ लागला पाहिजे, अशी मागणी केली. पत्रकार संजीव कुळकर्णी, केशव घोणसे पाटील, शंतनू डोईफोडे, विश्वनाथ देशमुख, धोंडोपंत विष्णुपुरीकर, बालाजी इबितवार, कालिदास जहागीरदार, प्रशांत गवळे, अनुराग पोवळे, पवनसिंह बस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, गडप्पा, करणसिंह बस आदी पत्रकार-छायाचित्रकार उपस्थित होते.
सीबीआय चौकशीची मागणी
वार्ताहर, हिंगोली
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा शहरातील विविध सामाजिक संघटना, अंनिसच्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी तीव्र निषेध केला. या बाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी
नरेंद्र पोयाम यांना निवेदन दिल्यानंतर आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत प्रकाश इंगोले, खंडेराव सरनाईक, रमेश धाबे, संजय कुलकर्णी, प्रकाश सनपूरकर यांनी या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.