मालकाच्या भावाला पुण्याला सोडायला गेलेल्या दहिसरमधील चालकाची गळा चिरून रसायनी येथे हत्या करण्यात आली. रस्त्यालगत असणाऱ्या खड्डय़ामध्ये हा मृतदेह बेवारस अवस्थेत रसायनी पोलिसांना आढळला. मारुती रामचंद्र घुटे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
इनोव्हा गाडीवर चालक असणारे घुटे सोमवारी दुपारी दोन वाजता पुणे येथे त्यांच्या मालकाच्या भावाला सोडून घरी न परतल्याने घुटे कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात गाडी आणि घुटे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घुटे यांचा मृतदेह रसायनी येथील घोसाळवाडी येथील साचलेल्या पाण्याच्या खड्डय़ात आढळला. मृतदेहाजवळील सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नातेवाइकांशी पोलिसांनी संपर्क साधला. याच प्रकरणातील बेपत्ता असलेली इनोव्हा गाडी, पुणे (मंचर रोड) कळंबण येथील ग्रामस्थांना बेवारस अवस्थेत दिसली. पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात मारुती यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मारुती यांचा गळा चिरून ही हत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान स्पष्ट झाले. मूळ गाव लातूर येथील असणारे घुटे यांची हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचे गूढ अजूनही कायम आहे. या हत्येचे धागेदोरे पुणे व मुंबईशी निगडित असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. शिंदे यांची दोन पथके मारुती यांच्या खुन्यांचा शोध घेत आहेत.