राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार यांना मार्गदर्शनासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाने राज्यातील दुष्काळ आणि विदर्भातील कडक उन्हामुळे हे शिबीर रद्द केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीतील गटबाजीचे प्रदर्शन टाळण्यासाठी हे शिबीर रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.
भविष्यातील निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने येथे विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबीर येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांच्या उपस्थितीत या शिबिराच्या आयोजनाची माहिती त्यांनी दिली होती. या शिबिराचे यजमानपद अकोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण विभागाने घेतले होते, पण राज्यातील दुष्काळ पाहता हे शिबीर घेणे उचित नसल्याने ते रद्द करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या विषयी या शिबिराचे यजमान व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांना विचारणा केली असता त्यांनी हे शिबीर अद्याप रद्द झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता या शिबिराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अजित पवारांचा दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाशीम जिल्ह्य़ातील मालेगाव येथे दिवंगत अरुणबाबा इंगोले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे ५ मे रोजी सकाळी १० वाजता लोकार्पण होईल. या दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्यातून मालेगावला जाणार असल्याची माहिती मिळाली. या दौऱ्यात अकोल्यातील राष्ट्रवादीच्या गटातटाचे प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होण्याची दाट शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली. तसेच मालेगाव येथील राष्ट्रवादीच्या एका गटामार्फत उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द व्हावा यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होतो की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीच्या शिबिराला दुष्काळाच्या झळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार यांना मार्गदर्शनासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
First published on: 03-05-2013 at 02:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought effect on ncp camp