वर्षांनुवर्षे परकीय आक्रमकांच्या टाचेखाली चिरडलेल्या देशवासीयांना महाराजांच्या  स्वराज्याने जगण्याची नवी उमेद दिली. विद्यमान सत्ताधीशांनी जुळवून घेतले असते तर महाराजांना संपूर्ण ३६ जिल्ह्य़ांच्या महाराष्ट्राची जहागिरी मिळाली असती, पण त्यापेक्षा छोटय़ा स्वराज्याचा राजा होण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यामुळेच त्यांची राष्ट्रपुरुषांमध्ये गणना होते, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अंबरनाथ येथे शिवराज्याभिषेक दिनी आयोजित प्रकट मुलाखतीदरम्यान केले.
सध्याच्या महाराष्ट्राची तुलना करता शिवाजी महाराजांचे स्वराज्य आकाराने खूपच लहान म्हणजे अवघ्या साडेसहा जिल्ह्य़ांचे होते. विदर्भ, मराठवाडा, खान्देश हे प्रांत कधीही स्वराज्यात नव्हते. इतकेच काय जन्मस्थान असलेला पुण्यातील शिवनेरी किल्लाही शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीत स्वराज्यात घेता आला नाही. उलट कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या भागात स्वराज्याचा अधिक भाग होता.
स्वराज्यात जातीपातींना थारा नव्हता. नेमणुका वारसा हक्काने नव्हे तर कर्तबगारी आणि गुणवत्तेवर होत होत्या. एकाच वेळी मोगल, पोर्तुगीज, सिद्धी या परकीयांसोबत स्वदेशातील विरोधकांचा त्यांना सामना करावा लागला. मित्रांपेक्षा त्यांना शत्रूच जास्त होते. चारही बाजूंनी विरोधक असूनही त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. देशाच्या पुढील जडणघडणीवर महाराष्ट्रातील या छोटय़ा स्वराज्याचा फार मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांच्या राज्याभिषेक दिनास १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीइतकेच महत्त्व आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. इतिहास अभ्यासक राजेंद्र घुमे आणि पत्रकार भूषण करंदीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर ‘जाणता राजा’ या महानाटय़ातील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग सादर करण्यात आला. शिवचरित्र कथनास ७५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल बाबासाहेबांचा या वेळी सत्कारही करण्यात आला.