नागपूर शहर पोलिसांची खुफिया यंत्रणा सुस्त झाली असल्याचे गेल्या काही घटनांनी स्पष्ट झाले असून या यंत्रणांना दक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांना कौशल्य पणास लावावे लागणार आहे. गुरुवारी महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांनी केलेली घोषणाबाजी पूर्वनियोजित असल्याचे लपून राहिले नाही. घोषणा सुरू झाल्यानंतर पोलिसांची अक्षरश: धावाधाव झाली. यासंबंधीच्या हालचाली सुरू असल्याचे पोलिसांना आधीच समजले असते तर एवढी धावाधाव करावी लागली नसती.
कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त संचलन झाले. पालकमंत्री शिवाजीराव मोघे भाषण करीत असताना त्यांच्या अगदी काही पावले अंतरावर उभे राहून विदर्भवाद्यांनी घोषणा दिल्या. अचानक झालेल्या या घटनेने पोलिसांची धावाधाव झाली नसती तरच नवल. कार्यक्रमस्थळी पुरेसा बंदोबस्त होता आणि तेथील सतर्क पोलिसांनी खबरदारी घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. सुदैवाने केवळ घोषणाबाजी झाली. स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचा याआधीचा इतिहास पोलीस यंत्रणेला माहिती आहे. मात्र, आता हे आंदोलन थंड झाले आहे, असे मनोमन ठरवित त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होते.  
गणेशपेठेत मंगळवारी सायंकाळी महापालिका सफाई कर्मचाऱ्याचा खून झाला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्याची अंत्ययात्रा निघाली. आरोपींना अटक झालेली नसल्याने संतप्त नागरिकांनी त्याचा मृतदेह गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेला. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त महिला पोलीस ठाण्यात शिरत असल्याचे दिसताच पोलिसांची धावाधाव झाली. केवळ दोन महिला शिपाई आणि इतर पुरुष शिपायांनी कसेबसे काठय़ांनी ढकलत महिलांना दूर सारले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण टेंभरे यांचा पोलीस खात्यातील दीर्घ अनुभव कामी आला. त्यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली. येथेही पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला नाही. मृत तरुणाचे घर ते पोलीस ठाणे साधारण एक किलोमीटर अंतर आहे. मृतदेह पोलीस ठाण्यात नेला जाईल, याची कुणकुणही पोलिसांना लागू नये, असा प्रश्न निर्माण होतो. प्रामाणिकपणे कानोसा घेतला असता तर आधीच जमावातील महिलांची संख्या पाहून पुरेसे महिला पोलीस तैनात करता आल्या असत्या.
काही महिन्यांपूर्वी रात्री संतप्त जमावाने महाराजबागजवळ एका गुंडाची हत्या केली. त्या घटनेआधी कुणकुण पोलिसांना लागली नव्हती. नागपूर शहरात २३ पोलीस ठाणे असून प्रत्येक ठाण्यात किमान दोन खुफिया असतात. पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच कार्यक्रम वा आंदोलनस्थळी कानोसा घेत गुप्त हालचाली टिपणे, ही त्यांची जबाबदारी असते. याशिवाय विशेष शाखा असून उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कर्मचारी तेथे असतात. शहरातील गुप्त हालचाली टिपण्याचे काम त्यांच्याकडे असते. राजकीय पक्षनिहाय, धार्मिक सणनिहाय तसेच ज्वलंत समस्यानिहाय (हेड) जबाबदारी ठरविलेली असते. कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी घडलेल्या घटनेची विदर्भ हेड असलेल्या अधिकारी वा कर्मचाऱ्याला ही हालचाल टिपता आली नाही काय? गणेशपेठेत जमाव पोलीस ठाण्याकडे जाईल, याचा कानोसा तेथील खुफिया किंवा विशेष शाखेने कसा घेतला नाही, आदी प्रश्न निर्माण होतात.  खुफिया यंत्रणा सुस्त झाली असल्याचे या घटनांनी स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षे गुप्तचर खात्यात काम केलेल्या विद्यमान पोलीस आयुक्तांच्या नजरेतून या बाबी सुटलेल्या नाहीत. यामुळे विद्यमान पोलीस आयुक्त अस्वस्थ झाले नसते तरच नवल. त्यांनी तशी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली असल्याचे समजते. गुप्तचर यंत्रणेला दक्ष ठेवण्यासाठी आता थेट पोलीस आयुक्तांना लक्ष ठेवावे लागणार आहे. विदर्भ आंदोलन योग्य की अयोग्य, हा स्वतंत्र विषय असला तरी कुठलेही आंदोलन हिंसक होऊ नये, कुठल्याही घटनांना हिंसक वळण मिळू नये, दहशतवादी घटना घडू नयेत यासाठी शहरात तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठल्या हालचाली सुरू आहेत, याची खुफिया यंत्रणेला जाणीव असणे गरजेचे आहे. किमान कुणकुण लागायला हवी, याची काळजी खुफिया वा विशेष शाखेने घ्यायची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.