* डॉक्टरला फटका  
* निवडणूक काळात बनावट  नोटांचा सुळसुळाट
भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी शत्रू देशांनी, त्या देशांतर्गत मित्रांनी बनावट भारतीय चलनी नोटा वापरात आणण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केला असून याचा फटका जसा सरकारला बसतो तसाच तो सामान्य नागरिकांनाही बसू लागला आहे. शहरातील एका डॉक्टरला नुकताच असा फटका बसला असून त्याचे जवळपास ४ हजार रुपये गेले आहेत. अकोला शहरात व बाजारपेठेत जवळपास २ कोटींच्या बनावट नोटा चलनात असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित डॉक्टरला दोन रुग्णांनी प्रत्येकी ५०० ची एक नोट दिली, तर एकाने १००० ची नोट दिली. डॉक्टरांनी त्या दोन रुग्णांना प्रत्येकी ४५० रुपये परत केले, तर एक हजारची नोट देणाऱ्या रुग्णाला ९५० रुपये परत केले. डॉक्टरांनी नंतर त्या नोटा बँकेत आपल्या खात्यात भरण्यासाठी पाठविल्या असता त्यातील ५०० च्या चलनी मूल्याच्या दोन व १००० च्या चलनी मूल्याची एक नोट बँकेला बनावट आढळली. बँकेने तात्काळ त्या नोटांवर फुली मारून कचरापेटीत टाकून दिल्या. या प्रकाराने डॉक्टरांजवळील २००० रुपये व त्यांनी रुग्णाला परत केलेले १८५० असे एकूण ३८५० रुपये गमवावे लागले आहेत. याबाबत स्थानिक स्टेट बँकेत चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व बँकाँच्या नोटा आमच्याकडे येतात. त्यात दररोज जवळपास ५० नोटा बनावट असतात. या नोटा आम्ही रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठवितो व त्या पुन्हा चलनात येणार नाही, असे प्रयत्न केले जातात. ज्या ग्राहकांचे विनाकारण अशा बनावट नोटांमुळे नुकसान होत असेल त्यांच्याकडून एक साधा अर्ज लिहून घेतला जातो व नंतर ही संपूर्ण प्रक्रिया रिझर्व बँकेकडून पूर्ण झाल्यावर संबंधित ग्राहकाला त्याचे रुपये परत केले जातात, अशी माहिती बँक अधिकाऱ्याने दिली, तर दुसरी माहिती अशी की, बनावट नोटा प्रकरणी फसवणूक झालेल्या ग्राहकाने जर बँकेत त्याबाबत अधिक विचारणा करून उपाय विचारला व आपला काहीच दोष नसताना ही बनावट नोट आली त्याचे पसे मिळावे, अशी मागणी केली तर संबंधित अधिकारी वा कारकून त्यास पोलीस तक्रारीची भीती दाखवितात. त्यामुळे आपला काहीच दोष नसतानासुद्धा उगाच पोलिसांची झंझट नको म्हणून अनेक लोक नुकसान सहन करून गुपचाप बसतात.
बँक सूत्राने याप्रकरणी आणखी माहिती देताना सांगितले की, निवडणुकीच्या काळात या बनावट नोटांचा ओघ बाजारात जास्त असतो, तसेच दिवाळी आदी मोठय़ा सणांच्या वेळीसुद्धा बाजारात बनावट चलनी नोटा मोठय़ा प्रमाणावर येतात. या नोटा ओळखण्यासाठी रिझर्व व स्टेट बँकेने बरेचदा वृत्तपत्रात प्रसिद्धी देऊन त्या कशा ओळखाव्यात, याची माहिती दिली, पण तरीही फसवणूक होतच आहे. पाकिस्तान व बांगलादेशच्या सीमेवरून बनावट चलनी नोटा फार मोठय़ा प्रमाणावर भारतात पाठविल्या जातात, अशी माहिती आहे.