वीज देयके भरण्यासाठी रांगेत ताटकळत राहण्याऐवजी ऑनलाइन देयके भरण्याकडे नाशिककरांचा कल वाढत आहे. गतवर्षीच्या संख्येत या पद्धतीने देयकांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या दुपटीने वाढून ३.७८ लाखापर्यंत पोहोचली आहे.
ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने विनाविलंब वीज देयकांचा भरणा करता यावा याकरिता ‘ई-बिलिंग’ सुविधेची संकल्पना मांडली आहे. बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा वरदान ठरल्याचे महावितरणने म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यात ऑनलाइन वीज देयक भरणा सुविधेचा वर्षभरात म्हणजे डिसेंबर २०१३ पर्यंत जवळपास ३.७८ लाख ग्राहकांनी लाभ घेतला. त्याद्वारे ५३.५३ कोटींचा महसूल कंपनीला प्राप्त झाला. गतवर्षी म्हणजे डिसेंबर २०१२ अखेरीस ही संख्या १.४५ लाख ग्राहक इतकी होती. त्याद्वारे १९.९८ कोटीचा महसूल संकलित झाला होता. या पद्धतीचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील ग्राहकांनी या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नाशिक शहरातील २.६३ लाख ग्राहकांनी ३२.१४ कोटींच्या देयकांचा ‘ई-बिलिंग’च्या सुविधेद्वारे भरणा केला तर ग्रामीण भागातील ४२,५७८ ग्राहकांनी ९.१७ कोटी
रुपयांच्या देयकांचा भरणा केला. तसेच अहमदनगर विभागातील ७२, ०६७ ग्राहकांनी १२.२१ कोटी रुपयांचा भरणा  केला. नाशिक परिमंडलात जानेवारी २०१४ मध्ये ४९,२६५ ग्राहकांनी ७.८५ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. महावितरणने http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाइन वीज बील भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
सर्व लघुदाब ग्राहकांना क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे अथवा नेटबँकिंगद्वारे वीज देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.