शासनाने शिक्षणाचे बाजारीकरण आणि खाजगीकरण केले आहे. शिक्षण महागडे होत चालले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. शिक्षणाला बाजारू व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल मोरे यांनी केले.
 बीड शहरात गुरुवारी एसएफआयच्या ३५ व्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल मोरे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी प्रांताचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब झिरपे, जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, प्रा. कुसुम मोरे, प्राचार्य सविता शेटे, विशाल गोरे आदी उपस्थित होते.
 या वेळी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात तरुणांनी देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी योगदान दिले. आपला देश कसा असावा, याचे चिंतन ते करत. आजच्या काळात तरुणांनी शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज आहे. एसएफआय ही भारतवादी, क्रांतिकारी संघटना आहे. त्यामुळे विद्यार्थी, तरुणांनी संघटनेत सहभागी होऊन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे.’