निवडणुकीत धनशक्तीचा वापर होणे लोकशाहीसाठी आव्हान असल्याने धनशक्तीचा असा वापर रोखण्यासाठी सर्वानी सजग राहून एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक संजीव श्रीवास्तव यांनी येथील प्रांत कार्यालयात आयोजित निवडणूक खर्चविषयक आढावा बैठकीत केले.
भारतातील निवडणुकांमध्ये अलिकडील काही वर्षांत महत्वपूर्ण बदल झाले आहेत. नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे मान्य करत निवडणूक प्रक्रिया निर्भय व भयमुक्त होण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पारदर्शक पध्दतीने जबाबदारी पार पाडावी असे आदेश श्रीवास्तव यांनी दिले.
निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना काही अडचणी असतील किंवा त्यांना कुठे काही गैरकृत्य आढळून आले तर त्यांनी तत्काळ व थेट संपर्क साधावा अशी सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप पाटील यांनी केली. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकांनी मतदारसंघातील घटनांवर करडी नजर ठेवावी असे आवाहन दुसरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी केले. बैठकीपूर्वी श्रीवास्तव यांनी धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य व बाह्य मतदार संघातील निवडणूक खर्चविषयक माहिती जाणून घेतली.  बैठकीस पोलीस उपअधिक्षक एम. आर. सवाई, योगेश चव्हाण. तहसीलदार दीपक पाटील, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी ए. आर. कबाडे आदी उपस्थित होते.