नेहमी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गजबजलेले सेनाभवन निकालाच्या दवशी मात्र एकदम शांत होते. सकाळी कार्यकर्ते विविध ठिकाणी सुरू असलेल्या मतदान मोजणी केंद्रावर उपस्थित होते. यामुळे सेनाभवनात तशी शांतता होती. कार्यालयीन  कर्मचारी काही प्रमुख नेते आणि थोडेसे कार्यकर्ते भवनातील टीव्हीवर निकाल पाहात होते. पक्षाला खात्रीलायक असलेल्या जागांचे नेमके काय झाले याबाबत एकीकडे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती मिळवली जात होती तर दुसरीकडे वृत्तवाहिन्यांवरील चर्चावरून चर्चा रंगत होती. भवनातील सभागृहात माध्यम प्रतिनिधींची गर्दी जमली होती. काही नेते त्यांच्याशी तणावपूर्ण वातावरणात चर्चा करत होते. याचदरम्यान ११.३०च्या सुमारास कोकणात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केल्याचे वृत्त आले आणि सेनाभवनात उपस्थितांनी एकच जल्लोष साजरा केला. राणे यांना हरविण्याचे सेनेचे स्वप्न साकार झाल्याची भावनाही कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या चर्चेत वरळीचे माजी उपविभागप्रमुख अरविंद भोसले यांना चप्पल पाठवा अशी चर्चा रंगली. कारण राणे यांचा पराभव होईपर्यंत चप्पल घालणार नाही असे वचन त्यांनी घेतले होते.
या निकालानंतर सेनाभवनात उत्साहाचे वातावरण दिसू लागले. इतक्यात माहीममध्ये मनसेला हरवून सेना विजयी झाल्याचे समजतातच सेना भवनात गड आला म्हणून आनंद व्यक्त होऊ लागला. दुपारी दीड वाजेपर्यंत काही मोजक्या माणसांची गर्दी असलेल्या सेनाभवनात माहीमच्या निकालानंतर गर्दी होऊ लागली. उत्साही कार्यकत्रे गाडय़ांना भगवे झेंडे लावून घोषणाबाजी करत परिसरात फिरू लागले. सेनाभवन ते शिवाजीपार्क परिसरात शिवसैनिकांची गर्दी दिसू लागली.