मुंबईत गिरणी कामगारांना घर देण्यासाठी काढलेल्या ६९२५ घरांसाठीच्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांपैकी आतापर्यंत ३८६० अर्जदार घरांसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३०० जणांना घराचा ताबादेखील मिळाला असून पैसे भरलेल्या ३१८ जणांना येत्या महिनाभरात घराचा ताबा मिळणार आहे. याशिवाय सुमारे ३२०० अर्जदारांना देकार पत्रे देण्यात आल्याने पैसे भरताच त्यांच्याही गृहप्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या जवळपास ६५० यशस्वी अर्जदारांनी दोन वेळा जाहिरात काढूनही अद्यापपर्यंत कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्यांच्या घराचा प्रश्न मात्र टांगणीवरच आहे.
मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी गिरण्यांच्या जागेवर उपलब्ध झालेल्या जमिनीवर कामगारांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी सरकारने ‘म्हाडा’वर सोपविली. सुमारे १.४७ लाख कामगारांकडून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले. पहिल्या टप्प्यात १८ गिरण्यांच्या जागेवरील ६९२५ तयार घरांसाठी ‘म्हाडा’ने सोडत काढली व त्यात या १८ गिरण्यांमधील सुमारे ४७ हजार कामगारांचा समावेश केला. जूनच्या अखेरीस बऱ्याच वादावादीनंतर ६९२५ घरांसाठी सोडत निघाली आणि विजेते जाहीर झाले.
या विजेत्यांना घर मिळाल्याबाबतचे सूचनापत्र पाठवून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम मुंबै बँकेवर सोपवण्यात आले. ६९२५ पैकी ६९०२ यशस्वी अर्जदारांनी ‘म्हाडा’कडे कागदपत्रे सादर केली. यापैकी सुमारे १६०० अर्जदारांचा वारसाहक्काचा प्रश्न असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया अर्जदारांनी सुरू केली आहे. घरासाठीचे देकारपत्र दिल्यानंतर पैसे भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. तसेच दंडासह पैसे भरण्यासाठी आणखी दीड महिन्याची मुदत मिळते. पैसे भरल्यानंतर ३८ हजार ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागते आणि ते ‘फ्रँक्रिंग’ करून आणल्यावर घराच्या देखभालीपोटीचे सुमारे ३० हजार रुपये भरले की घराचा ताबा देण्यात येतो. ३१८ जणांनी घराचे संपूर्ण पैसे भरले असून मुद्रांक शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ती झाली की त्यांना घराचा ताबा मिळेल. तसेच बाकी सुमारे ३२०० अर्जदारांनी कर्ज उभारून वा रोख स्वरूपात पैसे भरले की त्यांचा घराचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कालबद्ध कार्यक्रम हवा!
जवळपास सव्वा तीन हजार अर्जदारांना घराचे पैसे भरण्याबाबतचे पत्र गेले असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. यशस्वी अर्जदाराची पात्रता सिद्ध झाली की घराचे पैसे भरण्याबाबतचे कालबद्ध वेळापत्रक ‘म्हाडा’ने ठरवावे. तसेच ज्या कामगारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यांना त्यासाठी किती मुदत द्यायची याचाही निर्णय व्हायला हवा. ती शेवटची मुदत ठरवून त्यानंतरही कागदपत्रे न आलेल्या यशस्वी अर्जदारांची नावे बाजूला करून प्रतीक्षा यादीवरील कामगारांना संधी मिळायला हवी. अन्यथा ही प्रक्रिया अशीच अनिश्चित काळासाठी सुरू राहील.
– दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2013 रोजी प्रकाशित
गिरणी कामगारांच्या डोक्यावर अखेर म्हाडाचे छप्पर!
मुंबईत गिरणी कामगारांना घर देण्यासाठी काढलेल्या ६९२५ घरांसाठीच्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांपैकी आतापर्यंत ३८६० अर्जदार घरांसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३०० जणांना घराचा ताबादेखील मिळाला असून पैसे भरलेल्या ३१८ जणांना येत्या महिनाभरात घराचा ताबा मिळणार आहे. याशिवाय सुमारे ३२०० अर्जदारांना देकार पत्रे देण्यात आल्याने पैसे भरताच त्यांच्याही गृहप्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

First published on: 21-06-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eventually mhada sheltered them