बनावट नोटा चलनात आणून अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहे. चारकोप पोलिसांनी अशाच एका बांगलादेशी टोळीचा छडा लावला असून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
एक महिला आणि तिचे दोन साथीदार चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप रावराणे, महेश कुलकर्णी, मनोज दराडे, नितीन जगताप आदींच्या पथकाने सापळा लावून या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे ५०० आणि एक हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. नंतर गोरेगाव येथे असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांनाही अटक करून त्यांच्याकडील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी एकूण अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. हे सर्व आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. त्यांनी या नोटा कुठून आणल्या त्याचा तपास चारकोप पोलीस करीत आहेत.