जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक तालुका वगळता इतरत्र पावसाची स्थिती जेमतेमच असल्याने रब्बीपाठोपाठ खरीप हंगामही धोक्यात आला आहे. पिकांनी सध्या कसाबसा तग धरला असला तरी आठवडाभरात जोरदार पाऊस न आल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून शहर व परिसर तसेच नांदगाव तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचे प्रमाण अगदीच किरकोळ आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रात पावसाअभावी बिकट स्थिती आहे. जोरदार पावसाअभावी चांदवड, येवला, देवळा, सटाणा, मालेगाव, सिन्नर या तालुक्यांमधील तलावांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. तलाव न भरल्याने बहुतांश विहिरी अजूनही कोरडय़ाच आहेत. मागील महिन्यात झालेल्या रिमझिम पावसाच्या बळावर पिके तग धरून असली तरी अजून आठवडाभर त्यांना पाणी न मिळाल्यास ती निस्तेज होतील. गारपीट आणि बेमोसमी पावसामुळे याआधी रब्बी हंगाम हातातून गेला असताना खरिपानेही साथ न दिल्यास शेतकरी पुरता कोलमडण्याची भीती आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात पावसाने बऱ्यापैकी टिकाव धरला होता. पावसाचा जोर वाढून नद्या-नाल्यांना पूर येऊन विहिरींना पाणी येण्याची आशा वाटत असतानाच पाऊस गायब झाला. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही अलीकडील काही दिवसांत त्याचे प्रमाण अतिशय अल्प राहिले.
संभाव्य टंचाईचा सर्वाधिक फटका येवला, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर तसेच सटाण्याच्या काही भागास बसण्याची चिन्हे आहेत. सटाणा आणि मालेगाव तालुक्यास साहाय्यभूत ठरणारी चणकापूर आणि हरणबारी ही धरणे तुडुंब भरल्याने त्याचा फायदा नदीकाठच्या गावांना होणार आहे. या दोन तालुक्यांच्या इतर भागात पावसाअभावी पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. डोंगराळ भागात रिमझिम पावसाने जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला असला तरी कडक ऊन पडल्यास त्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भविष्यात जनावरांसाठी चाराटंचाईचे संकटही घोंघावू शकते. अशीच स्थिती इतर तालुक्यांमध्येही आहे. भविष्यात भेडसावणाऱ्या या संकटावर मंथन करण्याऐवजी राजकीय नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गर्क असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाच वर्षे कोणतीही कामे न करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता गृहीत धरून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आणि पावसाअभावी निर्माण होणाऱ्या स्थितीविषयी कोणीही भाष्य करीत नसल्याने निवडणुकीविषयी ग्रामीण भागात सध्या तरी निरुत्साहाचे वातावरण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2014 रोजी प्रकाशित
खरीप हंगामही धोक्यात!
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक तालुका वगळता इतरत्र पावसाची स्थिती जेमतेमच असल्याने रब्बीपाठोपाठ खरीप हंगामही धोक्यात आला आहे.
First published on: 23-08-2014 at 07:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers facing problem in kharip season