भारतात इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीचे स्थान १७६० नंतर बळकट झाले. या काळापासून तो थेट १८४० पर्यंत इंग्रजांनी पद्धतशीर षडयंत्र रचून भारतातील शेतीवर आधारित उद्योग नष्ट केल्यामुळे भारतातील गृहोद्योग व हस्तोद्योग नष्ट करण्यात आल्याने भारत बेरोजगारांचा देश बनला, असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय इतिहास परिषदेत बोलतांना प्रा.डॉ.कै लास नागुलकर यांनी केले.
विद्यापीठ अनुदान आयोगादारा दोन दिवसीय राष्ट्रीय इतिहास परिषदेचे आयोजन खामगावच्या एस.आर.मोहता महाविद्यालयात करण्यात आले होते. नागुलकर हे इतिहास विषयाचे आचार्य पदवीचे मार्गदर्शक आहेत. या दोन दिवसीय परिषदेत इतरही मान्यवर अभ्यासकांनी विविध विषयावर आपापली मते मांडली. ब्रिटीशकालीन भारताचे औद्योगिक व आर्थिक धोरण’ या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले, भारतातील शहरी व ग्रामीण भागातील उद्योगांची इंग्रजांनी पद्धतशीर कोंडी केली व आपले हस्तोद्योग व शेतीवर आधारित व्यवसाय नष्ट केल्यामुळेच आपली अर्थव्यवस्था कोलमडून गेली. येथे ब्रिटीश राजवट स्थापन होण्यापूर्वी हिंदुस्थानातील खेडी स्वयंपूर्ण होती. खेडय़ाला पुरेल एवढे धान्य खेडय़ातच उत्पन्न होत असल्याने लोकांच्या गरजा लोकांकडूनच भागविल्या जात होत्या. सूतकताई व कापड, तसेच विणकाम आदी व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केले जात होते, तर शेतकऱ्यांच्या गरजा पुरवण्यासाठी सुतार, लोहार, चांभार आदी व्यवसाय करणारे होते. त्यांना धान्याच्या रूपाने सेवेचा मोबदला दिला जात असे. शहरी भागात सुती कापड, मलमल, रेशीम, हस्तीदंत, सुवर्णालंकार इ.अनेक वस्तू मोठय़ा प्रमाणावर तयार होत असत. भारतातल्या या वस्तू जगभर प्रसिद्ध होत्या व साऱ्या जगातून त्यांना मागणी होती.
हिंदुस्थानची ही भरभराट पाहून ब्रिटीशांनी व्यापारी हेतूने भारतात प्रवेश केला व नंतर येथे राज्य केले. भारतीय वस्तूंना युरोपीय देशात, तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात प्रचंड मागणी होती, पण प्लासीच्या १७५७ च्या लढाईनंतर भारताच्या या वैभवशाली अर्थव्यवस्थेचे चित्र पार बदलले. या लढाईने प्रथम बंगालमधील आर्थिक नाडय़ा इंग्रजांच्या हाती आल्या व नंतर त्यांनी भारतातले एक-एक संस्थान हस्तगत करीत सारा भारत पादाक्रांत केला.
भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाल्यानंतर त्यांनी या देशाची अक्षरश: लूट केली, असे सांगून
डॉ. नागुलकर म्हणाले, भारतीयांनी उत्पादित केलेला माल ब्रिटीशांनी मनमानेल त्या किमतीत सक्तीने खरेदी करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर नवे कायदे बनवून हिंदी मालावर जबरदस्त कर बसवून हिंदुस्थानचा वैभवशाली व्यापार नष्ट केला.
इंग्रजांनी औद्योगिक क्रोंती व मुक्त व्यापार धोरणाच्या जोरावर यंत्रा द्वारे वस्तूंची निर्मिती करून भारतीयांचे हस्तकौशल्य व हस्तोद्योग नष्ट केले. इंग्रजांनी आपल्या व्यापारी हितासाठी इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना भारताची बाजारपेठ खुली करून दिली, तर दुसरीकडे भारतीय व्यापार वाढू नये म्हणून युरोपातील कोणत्याही देशाशी जलमार्गाने व्यापार करण्यास भारतीय व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली.
ब्रिटीशांनी भारतीय व्यापारावर घातलेल्या या बंदीमुळे येथील परंपरागत गृहोद्योग व इतर हस्तोद्योग पूर्णपणे उध्वस्त झालेत. १८व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने इंग्लंडचा औद्योगिक व आर्थिक चेहरामोहरा बदलून टाकला. इंग्लंडमधील उद्योगपतींनी भारत लुटण्याची आणखी वेगळी रणनिती तयार केली. त्यांनी येथे येऊन मोठमोठय़ा जमिनी खरेदी करून कारखाने व मळे उभारले. भारतातील कच्चा मालाच्या भरवशावर ब्रिटीशांनी आपली अर्थव्यवस्था मजबूत केली. भारतावर आपली पकड कायम करण्यासाठी व सर्वदूर पोहोचण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वे सुरू केली. आपल्या साम्राज्याच्या सुरक्षेसाठी खरे तर रेल्वेचे जाळे त्यांनी उभारले, तसेच इंग्लंडमध्ये तयार होणारा पक्का माल रेल्वेद्वारे भारतात कोठेही पोहोचविता येईल, ही त्या मागची भूमिका होती, असे त्यांनी सांगितले.