मतदारांच्या अदलाबदलीमुळे चर्चेत आलेल्या वाशीतील पोटनिवडणुकीतील ‘बोगस’ नावे वगळण्याचा निर्णय अखेर राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. वाशी सेक्टर-६ ते ८ या सुशिक्षित मतदारांच्या भरणा असलेल्या प्रभागात सेक्टर-४ येथील वसाहतींमधील सुमारे १४०० नावांचा समावेश करण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ५४ मध्ये शेजारच्या प्रभागातील नावे घुसवली गेल्याचे उघड होताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही मतांची एवढी मोठी अफरातफर होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना थांगपत्ताही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या पाश्र्वभूमीवर शेजारच्या प्रभागातील सुमारे १४०० नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येत्या आठ एप्रिल रोजी होणारी ही पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत दाखल झालेले ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्या प्रभागात ही पोटनिवडणूक होत आहे. पालकमंत्री नाईक आणि मोरे या दोघांसाठीही प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या या निवडणुकीत शेजारच्या प्रभागातील मतदारांची नावे घुसवली गेल्याने प्रभागातील प्रश्नाऐवजी या ‘बोगस’ मतांची चर्चा या भागात प्रचाराचा केंद्रिबदू ठरू लागली होती. वाशी सेक्टर-४ आणि ५ परिसरातील मतदारांची नावे पोटनिवडणूक जाहीर झालेल्या प्रभागात घुसवली गेल्याने या नावांची अफरातफर कोणी घडवली यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कलगीतुरा सुरूझाला होता. पालकमंत्र्यांचे कडवे समर्थक शशिकांत बिराजदार आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव गायकवाड यांनी ही बोगस नावे शिवसेनेने घुसवल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. या पोटनिवडणुकीचे काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महापालिकेचे अधिकारीच करीत आहेत. नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांचा गेल्या १७ वर्षांपासून एकहाती दबदबा आहे. असे असताना मतांची अफरातफर होत असताना महापालिकेत पदे भूषविणारे राष्ट्रवादीचे नेते अंधारात कसे राहिले, असा सवाल उपस्थित केला जात होता. शिवसेनेनेही या बोगस मतांवरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडत ‘चोरांच्या उलटय़ा बोंबा’, अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन्ही प्रमुख पक्षांनी यासंबंधी हरकत नोंदवल्याने निवडणूक आयोगाने शेजारील प्रभागातील १४०० मते वगळण्याचा निर्णय घेतला आहे.  
राष्ट्रवादीतर्फे विजया ठाकूर
विठ्ठल मोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने या प्रभागातील माजी नगरसेविका विजया ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकूर या सलग दोन वेळा या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे लढणारे विठ्ठल मोरे यांनी त्यांचा सुमारे ५०० मतांच्या अंतराने पराभव केला होता. मोरे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने ठाकूर यांना उमेदवारी दिल्याने या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये पुन्हा एकदा सामना रंगणार आहे.