जोखमीची कामे केवळ पुरुषांनीच करायची आणि महिलांनी जेथे जोखीम नसेल, तेथे नोकरी पत्करायची, ही संकल्पना कधीचीच मोडीत निघाली. जोखीम अंगावर झेलण्याची किमया महिलासुद्धा लिलया पेलू शकतात, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळेच विविध प्रशिक्षण संस्थांमधून आता त्याचे प्रशिक्षण द्यायलाही सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नागपुरातील मुलींसाठी ‘अग्नि आणि सुरक्षा’ हा अग्निशमन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलवर असलेली मुलींची गर्दी म्हणजे आम्हीही आव्हाने झेलण्यासाठी आणि पेलण्यासाठी तयार आहोत, हेच दर्शविणारी आहे.
आग लागणे आणि अग्निशमन खात्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी घेऊन ती आग विझवणे या कामावर आतापर्यंत केवळ पुरुषांचीच मक्तेदारी होती. मुंबईतील अग्निशिखाच्या माध्यमातून मुलींनी या पुरुषी वर्चस्वाच्या क्षेत्रावर मात केली आणि हळूहळू या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्याही वाढायला लागली. मोठय़ा शहरांमधील सरकारी आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून आता असे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. विमान, जहाजाची कमान हाती असणाऱ्या महिलांची संख्या बरीच वाढली आहे. त्याचबरोबर लष्करातील महिलांचा सहभागसुद्धा वाढतो आहे.
मात्र, अग्नीवर मात करणे ही त्यापेक्षाही मोठी जोखीम आहे, पण यातही महिला मागे नाहीत, हे मुंबईतल्या अग्निशिखांनी दाखवून दिले. मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर या क्षेत्रातील मानवी अस्तित्त्वाची कमतरता जाणवली. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आता महिला पुढे येत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नागपुरात या संस्थेच्या माध्यमातून यावर्षीपासून अग्निशमनाचे प्रशिक्षण मुलींना देण्यात येणार आहे.
युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये लागलेल्या या संस्थेच्या स्टॉलवर मुलींची गर्दी बघता पहिली बॅच यावर्षी नक्कीच सुरू होईल, असा विश्वास संस्थेच्या मंजिरी जावडेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला.
नागपूर विभागीय केंद्राचा पुढाकार
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर विभागीय केंद्राच्यावतीने दहावी पास मुलीसुद्धा या सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. केवळ प्रशिक्षण देऊन विद्यार्थिनींना मोकळे करायचे, हा त्यामागील उद्देश नाही, तर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीसुद्धा या संस्थेने उचलली आहे. चार भिंतीच्या आत हे प्रशिक्षण नाही तर प्रात्यक्षिकसुद्धा त्यांना दिले जात आहे. त्यासाठी विविध कंपन्यांशी त्यांनी बोलणी केलेली आहे. जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर असा सहा-सहा महिन्याचा हा प्रशिक्षणाचा कालावधी आहे.