विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ५ कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून विविध संशोधन प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ आमदार दिलीपराव देशमुख व अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी दिली.
मागील वर्षी नांदेड रस्त्यावर या महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन लोकनेते विलासराव देशमुख यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव डॉ. भान उपस्थित होते. या वेळी विलासरावांनी महाविद्यालयाच्या उपक्रमासाठी मदत करावी, असे सुचविले होते. या खात्याच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी महाविद्यालयास भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर नवी दिल्लीत ३ बैठका घेऊन चर्चा करण्यात आली.
अवर्षणग्रस्त भागात कमी पाण्यावर उसाची लागवड, क्षारपट जमिनी, नवीन ऊस जाती तयार करणे, नवीन जातीचे संशोधन प्रकल्प या महाविद्यालयात सुरू आहेत. हा प्रकल्प राबविण्यासाठी डॉ. हेमंत पाटील, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. अमोल देठे यांची समन्वयक व शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मंजूर झालेला ५ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे.