महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या मुख्य परीक्षेच्या निकालात अश्विनीची दुसऱ्याच प्रयत्नात सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रातून तिचा १०३ वा क्रमांक असून नागपुरातून ती तिसरी आहे. एम.एस्सी.(संगणक विज्ञान) पदवी संपादित केलेली अश्विनी चांगली प्रोग्रॅमर असून काही वर्षे तिने ‘फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी’मध्ये काम केले आहे.
स्वत: प्रोजेक्ट मिळवून तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. युपीएससीच्या तयारीनेच ती नागरी सेवांकडे वळली असून गेल्या नोव्हेंबरपासून ती भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण संस्थेची नियमित विद्यार्थिनी आहे. अश्विनीला वडील नाहीत. आई कमल बिजवे गडचिरोलीला स्टाफ नर्स म्हणून आता निवृत्त झाल्या आहेत.
अश्विनीने एमपीएससीची पहिली परीक्षा सहज एक अनुभव म्हणून दिली. दुसऱ्यांदा मात्र तिने जीव तोडून अभ्यास केला आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदापर्यंत मजल मारली.
 मात्र, तिला तेवढय़ावरच थांबायचे नाही, तर येत्या २६ मे रोजी होणाऱ्या युपीएससीच्या पूर्वपरीक्षेची ती जोरदार तयारी करीत आहे. संस्थेतील मार्गदर्शन, हवी ती पुस्तके आणि अभ्यासास पूरक वातावरण तिला मिळाले. सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत तिने संस्थेच्या वाचनालयाचा लाभ घेऊन ती रोज १५ तास अभ्यास करायची. ओबीसीमधून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चांगली प्रोग्रॅमर असतानाही ती नागरी सेवांकडे कशी काय वळली, या प्रश्नाला उत्तर देताना नोकरीतील स्थैर्य तिला जास्त महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले. एमपीएससी परीक्षेचा पॅटर्नच बदलल्याने गुण बरेच खाली आल्याचे तिने सांगितले.
‘इतिहास व भूगोल’, ‘राज्यघटना व लोकप्रशासन’, ‘एचआरडी’ आणि ‘अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान’ ही प्रत्येकी १५० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित पेपर होते. त्याच्या जोडीला इंग्रजी आणि मराठी प्रत्येकी १०० गुणांचे भाषा पेपर. मुलाखतीला १०० गुण, अशी ९०० गुणांची ही परीक्षा होती. बाकी विषयांपेक्षा एचआरडीसाठी पाहिजे तेवढे शैक्षणिक साहित्य उपलब्ध नव्हते. त्यामुळेच क्रमांक पिछाडीवर गेल्याचे अश्विनी म्हणाली.