आर्वी तालुक्यात शेकडो लोक विस्थापित होण्याची भीती
पुराचा फ टका बसलेल्या आर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये पूरसंरक्षक भिंती बांधणे आवश्यक झाले असून असे न झाल्यास पुन्हा पुराचा फ टका बसल्यास शेकडो लोक विस्थापित होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यावर्षी १२ जुलैला आर्वी तालुक्यातील बऱ्याच गावांना पुराचा तडाखा बसला. एकाच दिवशी १२० मि.मी.ची अतिवृष्टी झाल्याने ४०० वर कुटूंबांना अन्यत्र हलवावे लागले. ३ हजारांवर घरांची पडझड झाली. ४० हजारावर हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने पिकांची नासाडी झाली. एक मुलगा, शेकडो वाहने, तसेच जनावरेही वाहून गेली. यापूर्वी ४ सप्टेंबर २०१२ मध्येही असाच अतिवृष्टीने कहर केला होता. वारंवार पुराचा तडाखा बसण्यामागे काही तलावातील ओव्हरफ्लो व गावनाल्याला भिंत नसल्याचे मुख्य कारण दिले जाते. आर्वी शहरास वळसा घालणाऱ्या नाल्याला दरवर्षी पूर येत असल्याने त्याभोवती संरक्षण भिंत बांधणे गरजेचे ठरले आहे. सध्या या परिसरातील अडीच हजार कुटूंबांचे तात्काळ पुनर्वसन करणे आवश्यक ठरले आहे. तालुक्यातील रोहणा या १० हजार लोकवस्तीच्या गावातून भोलेश्वरी नदी वाहते. लागूनच निम्न वर्धा प्रकल्प असल्याने त्यातील बॅकवॉटरने नदीला पूर येतो. त्यामुळे दरवर्षी पुराचा तडाखा या गावाला सहन करावा लागतो. किनाऱ्यावरील गावकऱ्यांना दर पावसाळ्यात बिऱ्हाड हालवावे लागत असल्याने भोलेश्वरी नदीच्या दोन्ही तिरावर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होते.
बोरीबारा गावाला लागून कुऱ्हा तलाव आहे. कोलाम वस्तीचे हे गाव पुराने हादरून गेले आहे. तलावातील पाणीसाठा वाढल्याने संपूर्ण गाव विस्थापित झाले असून ३५ कुटूंब लगतच्या शेतात तात्पुरत्या निवाऱ्यात आश्रयास आहेत. या गावाच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे. पाणवाडी गावावर पावसाळ्यात दरवर्षीच जलमय होण्याची आपत्ती असते. नाल्याला येणारा पूर व सुकळी उबार प्रकल्पाच्या बॅकवाटरने गावातील जनजीवन संकटात सापडले असल्याने गावाच्या पुनर्वसनाची मागणी होते. याखेरीज वर्धा नदीकाठी असणारी अनेक गावे दरवर्षी पुराच्या फ टक्याने गारद होण्याचा अनुभव आहे.
प्रामुख्याने धनोडी-बहादूरपूर, रसुलाबाद, नांदपूर, साटोडा-बेनोडा, शिरपूर, बेलोरा, वर्धमनेरी, चिस्तूर, आनंदवाडी, लिंगापूर, लहान आर्वी, अंबिकापूर-देलवाडी, चिंचोली, दलपतपूर, खंबित, अंतोरा, धाडी, साहूर, कन्नमवारग्राम, टेंभरी परसोडी, तळेगाव या नदीकाठच्या गावांना नेहमी बसणारा पुराचा फ टका टाळण्यासाठी गावनदीला संरक्षक भिंत आवश्यक ठरली आहे. कायमस्वरूपी उपाय न झाल्यास वित्त व प्राणहानीचे संकट या गावांवर थोडय़ा पावसानेही कोसळण्याची भीती आहे.
या अशा गावातून अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी या समस्यांवर शक्य तेवढय़ा लवकर प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातल्या अतिवृष्टीसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून ही कामे तातडीने करावी, अशीही मागणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
पूरसंरक्षक भिंती न बांधल्यास पुन्हा पुराचा फटका
आर्वी तालुक्यात शेकडो लोक विस्थापित होण्याची भीती पुराचा फ टका बसलेल्या आर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये पूरसंरक्षक भिंती बांधणे आवश्यक झाले असून
First published on: 27-08-2013 at 08:50 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood proof wall should be created