उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील अनेक ठिकाणची फुलशेती धोक्यात आली असून बाजारपेठेत विविध फुलांचे दर वाढल्याने हार विक्रेते अडचणीत सापडले आहेत. मे आणि जूनमध्ये लग्नसराईची धामधूम असल्याने वरमालाही चांगल्या महागणार असल्याची चिन्हे आहेत.
एकीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असताना दुसरीकडे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्याचा परिणाम भाजीपाला व फुल उत्पादनावर झाला असून त्यामुळे वाढत्या उन्हाबरोबर महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांत बाजारपेठेत भाजीपाला चांगलाच महागला असून पूर्वीपेक्षा दुपटीने वाढले आहेत. पाणी टंचाई व भारनियमन याचा फटका फुलशेतीला बसल्याने फुलाच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. बाजारपेठेत फुलाची आवक कमी झाल्याने व मागणी प्रचंड वाढल्याने फुलांचे दर गगनाला जाऊन भिडले आहेत. सीताबर्डीवरील फूलबाजारात फेरफटका मारला असता शेवंती, गुलाब, जास्वंद, मोगरा, गेंदा आदी फुलांची आवक कमी झाली आहे. विशेषत शोभेच्या फुलांची किंमती दुपटीने वाढल्या आहेत. लग्नसराईची धामधूम असल्याने समारंभामध्ये फुलांची सजावट केली जाते मात्र यावर्षी फुलांची आवक कमी झाली असून आणि दुपटीने भाव वाढल्याने सजावट करणाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. मोगरा ६० रुपयांवरून ४०० रुपये किलोवर पोहोचल्याने बाजारात तीन ते चार रुपयांना मिळणारा गजरा आता आठ ते दहा रुपयांना झाला आहे. तर गुलाबाचे एक किलोचे दर तीस रुपयांवरून ऐंशी रुपयांवर पोहोचले आहेत. गलांडय़ाच्या फुलाची एक रुपयांची पेंडी आता दहा ते बारा रुपयांना झाली आहे. निशिगंध ४० रुपयांवरून ९० रुपयांवर पोहोचला आहे. इंग्लिश गुलाबाची एक पेंडी पाच रुपयांना होती. सध्या तिचा दर वीस रुपये एवढा झाला आहे. तर शेवंतीचे फूल मात्र बाजारात फारसे उपलब्ध नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फुलाचे दर वाढल्याने हार विक्रेत्यांनी हारांच्या किमतीत वाढ केली आहे.
दहा रुपयांना मिळणारा फुलांचा हार आता पंचवीस रुपयांना झाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने फुलांना व हारांना प्रचंड मागणी असून वधू-वरांसाठी लागणाऱ्या ‘वरमालांची’ किंमत दोनशे रुपयांहून पाचशे रुपयांवर पोहोचली आहे. फुलांचे दर एवढे प्रचंड वाढलेले असतानाही मागणीप्रमाणे माल उपलब्ध होत नसल्याचे विक्रेते विदर्भ फुल बाजार असोसिएशनचे विजय मालोकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2013 रोजी प्रकाशित
पाण्याअभावी विदर्भातील फूलशेती धोक्यात
उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील अनेक ठिकाणची फुलशेती धोक्यात आली असून बाजारपेठेत विविध फुलांचे दर वाढल्याने हार विक्रेते अडचणीत सापडले आहेत. मे आणि जूनमध्ये लग्नसराईची धामधूम असल्याने वरमालाही चांगल्या महागणार असल्याची चिन्हे आहेत.
First published on: 18-05-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flower farm in danger due to water shortage