सोलापूरचे माजी जिल्हा सरकारी वकील शंकरराव कोंडो तथा बापूसाहेब कालेकर (वय ९५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कालेकर यांचे गर्भश्रीमंत असलेले घराणे मूळचे माळशिरस तालुक्यातील पिलीवचे. घरावर दरोडा पडणार असल्याची माहिती समजल्याने कालेकर यांचे वडील सोलापुरात येऊन स्थायिक झाले. नव्यापेठेतील प्रसिध्द कालेकर इमारतीत राहणारे शंकरराव कालेकर हे लक्ष्मीपुत्र होते. नंतर ते सरस्वतीपुत्र झाले. दिवंगत ज्येष्ठ फौजदारी वकील ए. तु. तथा अण्णासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव कालेकर यांची जडणघडण झाली. कुशाग्र बुध्दी, अपार कष्ट करण्याची तयारी, सकारात्मक दृष्टिकोन व कायदा तोंडपाठ या गुणांमुळे कालेकर यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळविला. पुढे ते सहायक सरकारी होऊन नंतर गुणवत्तेच्या बळावर जिल्हा सरकारी वकील झाले. त्यांनी त्या काळात अनेक गाजलेले खटले चालविले. भागवत चित्रपटगृह परिसरातील गाजलेल्या मच्छिंद्र शिंदे खून खटल्यातील आरोपी जन्मठेपेवर गेले. त्याचे संपूर्ण श्रेय केवळ शंकरराव तथा बापूसाहेब कालेकरांना दिले जाते. तर वृद्ध मावशी रमाबाई मोहोळकर यांचा निर्घृण खून करणारा भाचा यशवंत मोहोळकर यास फाशीची शिक्षा झाली. बापूसाहेबांना अनेक पुरस्कार मिळाले. पत्नी व पुत्र अॅड. अशोक कालेकर यांच्या अकाली निधनाचे दु:ख पचवित बापूसाहेब कालेकर यांनी आपले वैयक्तिक जीवन आनंदी ठेवले. दररोज पहाटे नियमितपणे फिरायला जाण्याचा शिरस्ता त्यांनी कधीही मोडला नव्हता. अलीकडे ते कोल्हापुरात आपल्या कन्येकडे वास्तव्यास असताना अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कोल्हापुरात पंचगंगेच्या किनारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोलापूर बार असोसिएशनच्या शोकसभेत बापूसाहेब कालेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.